Ranji Trophy Semifinal। मुंबई: अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील मुंबईच्या संघासमोर उपांत्य फेरीत तामिळनाडूचे आव्हान आहे. आज दुसऱ्या दिवशी कठीण परिस्थितीत शार्दुल ठाकूरने झंझावाती शतक झळकावून मुंबईचा डाव सावरला. रणजी ट्रॉफीमध्ये शनिवारपासून मुंबई आणि तामिळनाडू यांच्यात उपांत्य सामना खेळवला जात आहे. अंतिम फेरीचे तिकिट मिळवण्यासाठी दोन्हीही संघ मैदानात आहे. टीम इंडियातून बाहेर पडल्यानंतर मुंबईकर श्रेयस अय्यर आपल्या संघासोबत जोडला गेला आहे. मात्र, अय्यरला काही साजेशी कामगिरी करता आला नाही. संघ अडचणीत असताना शार्दुलने अप्रतिम खेळी करत शतक पूर्ण केले. त्याने ८९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. ८३.१ षटकांपर्यंत मुंबईची धावसंख्या ८ बाद २८६ आहे. शार्दुल (१०७) आणि तनुश कोटियन (२७) खेळपट्टीवर टिकून आहेत.
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील मुंबईने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी करताना पाहुण्या तामिळनाडू संघाला अवघ्या १४६ धावांत रोखले. मुंबईकडून तुषार देशपांडेने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर शार्दुल ठाकूर (२), मुशीर खान (२), तनुश कोटियन (२) आणि मोहित अवस्थीला (१) बळी घेण्यात यश आले.
खरं तर तामिळनाडूकडून एकाही खेळाडूला अर्धशतकी खेळी करता आली नाही. संघाकडून विजय शंकरने सर्वाधिक ४४ धावा केल्या पण त्याला शार्दुल ठाकूरने बाहेरचा रस्ता दाखवला. अखेर पाहुणा संघ ६४.१ षटकांत अवघ्या १४६ धावांवर सर्वबाद झाला. तामिळनाडूचा संघ पहिल्या डावात स्वस्तात तंबूत परतल्यानंतर मोठी धावसंख्या उभारण्याची सुवर्णसंधी मुंबईच्या संघाकडे होती. मात्र, यजमानांना देखील साजेशी कामगिरी करता आली नाही. पण शार्दुल ठाकूरची शतकी खेळी याला अपवाद ठरली.
रहाणे-अय्यर ढेपाळलेतामिळनाडूने १४६ धावा केल्यानंतर प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या मुंबईला सुरूवातीपासूनच मोठे धक्के बसले. अवघ्या ५ धावांवर पृथ्वी शॉच्या रूपात पहिला झटका बसला. त्यानंतर संघाच्या ४० धावांवर मुंबईचा दुसरा गडी बाद झाला. मुंबईकडून मुशीर खानने सर्वाधिक ५५ धावांची खेळी केली पण त्याला साई किशोरने जास्त वेळ खेळपट्टीवर टिकू दिले नाही. कर्णधार अजिंक्य रहाणे (६७ चेंडू १९ धावा) आणि श्रेयस अय्यर (८ चेंडू ३ धावा) करून बाद झाला. रहाणेला साई किशोरने तर अय्यरला संदीप वॉरियरने बाद केले. ५०.२ षटकांपर्यंत मुंबईच्या संघाची धावसंख्या ७ बाद १२५ एवढी अशी होती. एकूणच गोलंदाजांनी कमाल करूनही मुंबईला चांगली आघाडी घेता आली नाही. पण शार्दुलच्या शतकामुळे मुंबईच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला.