Join us  

४२ वे विजेतेपद! मुंबईने ८ वर्षानंतर रणजी करंडक उंचावला; विदर्भाने १४ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

मुंबईने रणजी करंडक स्पर्धेच्या फायनलमध्ये बाजी मारून ८ वर्षानंतर चषक उंचावला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 1:35 PM

Open in App

Mumbai vs Vidarbha Ranji Trophy Final : मुंबईनेरणजी करंडक स्पर्धेच्या फायनलमध्ये बाजी मारून ८ वर्षानंतर चषक उंचावला. अंतिम सामन्यात मुंबईने दिलेल्या ५३८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विदर्भाने चिवट खेळ करताना चौथ्या दिवसअखेर ९२ षटकांत ५ बाद २४८ धावा केल्या होत्या. करुण नायरने विदर्भाच्या आशा कायम राखताना २२० चेंडूंत ७४ धावा केल्या होत्या; परंतु दिवसातील ३२ चेंडू शिल्लक असताना करुणला बाद करीत मुशीर खानने मुंबईला पूर्ण पकड मिळवून दिली. विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरने पाचव्या दिवशी शतक झळकावून खिंड लढवली होती. पण, १९९ चेंडूंत १०२ धावांवर तो बाद झाला आणि मुंबईचा विजय पक्का झाला. मुंबईने १६९ धावांनी सामना जिंकला.

अखेरचा प्रथम श्रेणी सामना खेळणाऱ्या धवन कुलकर्णीला कर्णधार अजिंक्य रहाणेने चेंडू दिला आणि त्याने शेवटची विकेट घेत मुंबईचा विजय पक्का केला. मुंबईकडून तनुष कोटियनने ४, तुषार देशपांडे व मुशीर खान यांनी प्रत्येकी २, तर शाम्स मुलानी व धवल कुलकर्णी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. विदर्भाचा दुसरा डावा ३६८ धावांवर गडगडला. मुंबईने पहिल्या डावात २२४ धावा केल्या होत्या, पण, विदर्भाला १०५ धावाच करता आल्याने मुंबईला ११९ धावांची आघाडी मिळाली. त्यात मुंबईने दुसऱ्या डावात ४१८ धावा करून विदर्भासमोर तगडे लक्ष्य ठेवले. 

विदर्भाची चौथ्या डावातील ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली. त्यांनी ४ डिसेंबर २०१० मध्ये सर्व्हिसच्या ३५३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ३५० धावांपर्यंत मजल मारली होती. अवघ्या ३ धावांनी त्यांना पराभव पत्करावा लागला होता. 

 

टॅग्स :रणजी करंडकमुंबई