Ajinkya Rahane Hit Century Ranji Trophy Quarter Final : रणजी करंडक स्पर्धेत मुंबई संघाचे नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेनं पुन्हा एकदा आपल्या बॅटिंगमधील कर्तृत्व दाखवून दिलं आहे. हरयाणा विरुद्धच्या उपांत्यपूर्व लढतीत मुंबईकर अजिंक्य रहाणेनं शतकी खेळी केली आहे. बऱ्याच दिवसांपासून भारतीय संघाबाहेर असलेला रहाणे देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी करून सातत्याने आपल्यातील धमक दाखवून देताना दिसतोय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहिल्या डावात स्वस्तात आटोपला, दुसऱ्या वेळी शतक करून परतला.
हरयाणाविरुद्धच्या सामन्यात अजिंक्य रहाणेनं १६० चेंडूत शतकाला गवसणी घातली. या डावात त्याने १०८ धावांची दमदार खेळी केली. त्याच्या भात्यातून १३ खणखीत चौकार आपल्याचे पाहायला मिळाले. रहाणेच्या शतकी खेळीच्या जोरावर मुंबईच्या संघाने मॅचमध्ये मजबूत पकड मिळवली आहे. पहिल्या डावात रहाणेला सूर गवसला पण मोठी खेळी करता आली नव्हती. तो ३१ धावांवर बाद झाला होता. पण दुसऱ्या डावात त्याने शतकी तोरा दाखवून देत कॅप्टन्सीला साजेसा खेळ करून दाखवला.
संघाची अवस्था बिकट असताना उतरला होता मैदानात
मुंबईच्या संघानं दुसऱ्या डावात ४८ धावांवर २ गडी गमावल्यावर अजिंक्य रहाणे मैदानात आला. त्याने संयमी खेळी करत संघाचा डाव सावरला. सिद्धेश लाडच्या साथीनं अर्धशतकी भागीदारी रचत त्याने डावाला आकार दिला. त्यानंतर सूर्यकुमार यादवच्या साथीनं त्याने चौथ्या विकेटसाठी १२९ धावांची दमदार भागीदारी केली. यात सूर्यकुमार यादवनं ८६ चेंडूत ७० धावांची खेळी केली. सूर्या तंबूत परतल्यावर अजिंक्यनं शिवम दुबेसह ८५ धावांची भागीदारी रचली.
अजिंक्य पुन्हा ठोठावतोय टीम इंडियाचा दरवाजा
देशांतर्गत क्रिकेटमध्ये काही सामने वगळले तर सातत्याने अजिंक्य रहाणे दमदार कामगिरी करताना पाहायला मिळाले आहे. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरलाहोता. . ९ सामन्यात त्याने १६४ च्या सरासरीनं ४६९ धावा काढल्या होत्या. यात पाच अर्धशतकांचा समावेश होता. रणजी स्पर्धेतील आतापर्यंतच्या ८ सामन्यात त्याने ३९ च्या सरासरीनं ४३७ धावा केल्या आहेत.