IPL 2021चे विजेता चेन्नई सुपर किंग्सने (CSK) पुन्हा एकदा मजबूत संघ बनवला आहे. चेन्नईच्या बलाढ्य संघातील एक भाग म्हणजे भारताचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे. शिवम हा फटकेबाजी आणि गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. शिवम दुबेला चेन्नई सुपर किंग्जने ४ कोटी रुपयांना विकत घेतले. चेन्नईच्या या नव्या अष्टपैलू खेळाडूला एमएस धोनीकडून खूप आशा आहेत. शिवम दुबेने एका मुलाखतीत सांगितलं आहे की, धोनीच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी मी खूप आतुर आहे. तसेच, मी चांगली कामगिरी करून टीम इंडियात दणक्यात पुनरागमन करू शकेन, अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली.
"मला मुलगा झाला आणि लगेच माझं नशीब पालटलं. माझा हिरो एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळण्याचं माझं स्वप्न होतं. माझं स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या प्रत्येकाने चांगली कामगिरी केल्याचं मी पाहिलं आहे. धोनीचं मार्गदर्शन मिळालेल्या खेळाडूंना भारतीय संघात दीर्घकाळ चांगली कामगिरी करता आलेली आहे. मलाही CSKसाठी चांगली कामगिरी करून भारतीय संघात पुनरागमन करायचे आहे", असं टीओआयशी संवाद साधताना शिवम दुबे म्हणाला.
शिवम दुबेची IPL कामगिरी फारशी खास नाही...
IPL मध्ये शिवम दुबेने २४ सामन्यांमध्ये २२.१६ च्या सरासरीने ३९९ धावा केल्या आहेत आणि त्याचा स्ट्राइक रेट १२१ आहे. गेल्या हंगामात दुबेने २९ च्या सरासरीने २३० धावा केल्या होत्या. मात्र, त्याची गोलंदाजी फारशी चालली नव्हती. या खेळाडूच्या नावावर फक्त ४ विकेट्स आहेत आणि इकॉनॉमी रेट देखील ८ पेक्षा जास्त आहे.