Join us  

"मुंबईसाठी रणजी ट्रॉफी जिंकायचीय अन् टीम इंडियासाठी..."; अजिंक्य रहाणेने सांगितली 'मन की बात'

अजिंक्य रहाणेला अजूनही टीम इंडियात पुनरागमनाची आशा आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 12:51 PM

Open in App

Ajinkya Rahane Team India: मराठमोळा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे गेल्या १३ वर्षांपासून भारतीय क्रिकेटचा एक मजबूत आधारस्तंभ आहे. त्याने ८५ कसोटी सामने खेळले आहेत. राष्ट्रीय संघाच्या निवडकर्त्यांनी त्याला आगामी इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघातून वगळले असले तरी २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक मालिका विजय मिळवणाऱ्या अजिंक्यने मात्र आशा सोडलेल्या नाही. मधल्या फळीत दमदार कामगिरी करण्याची आणि संघात पुनरागमनाची अजिंक्यची इच्छा अजिबात कमी झालेली नाही. नुकतेच एका कार्यक्रमात अजिंक्य रहाणेने आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील दोन महत्त्वाची स्वप्न बोलून दाखवली.

निवड समितीकडून बाजूला काढण्यात आलेल्या रहाणेने गेल्या वर्षी शानदार पुनरागमन केले. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर, त्याने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी संघात स्थान मिळवले. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अंतिम सामन्यात तो सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज होता. यानंतर तो वेस्ट इंडिज दौऱ्यावरही संघाचा भाग होता. पण त्यानंतर रहाणेला वगळण्यात आले. असे असले तरी तो पुन्हा संघात स्थान येणार त्याने अजून परतण्याची आशा सोडलेली नाही.

मुंबईतील बीकेसी स्टेडियमवर मुंबईच्या दुसऱ्या फेरीच्या रणजी सामन्याच्या समारोपानंतर रहाणे म्हणाला, “माझ्या क्रिकेट कारकिर्दीत दोन इच्छा आहेत. एक म्हणजे मुंबईसाठी पुन्हा एकदा रणजी ट्रॉफी जिंकणे आणि दुसरे म्हणजे भारतीय संघासाठी १०० कसोटी सामने खेळणे. ही दोन लक्ष्य गाठणे हे माझे ध्येय आहे. मुंबईसाठी चांगली कामगिरी करण्यावर आणि प्रत्येक सामन्यात काळजीपूर्वक खेळण्यावर माझा भर असणार आहे."

दरम्यान, मोसमातील पहिल्या सामन्यात आंध्रविरुद्ध त्याला खातेही उघडता आले नाही. तसे झाले असले तरीही रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईला चौथ्या दिवशी दमदार विजय मिळवता आला.

टॅग्स :अजिंक्य रहाणेभारतीय क्रिकेट संघइंग्लंड