Prithvi Shaw, Royal London One-Day Cup: मुंबईकर क्रिकेटपटू पृथ्वी शॉ हा काही काळापासून टीम इंडियातून बाहेर आहे. तो पुनरागमनाच्या प्रतिक्षेत आहे. त्यासाठी तो इतर स्पर्धांमध्ये सातत्याने धावा करण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबईच्या पोराने सध्या इंग्लंडमध्ये कमाल केली. 'वनडे कप'मध्ये खेळत असताना त्याने नॉर्थम्प्टनशायरकडून सोमवारी तुफानी अर्धशतक झळकावले. पृथ्वी शॉ याने मिडलसेक्स विरुद्ध ५८ चेंडूत शानदार ७८ धावांची खेळी केली.
मिडलसेक्स संघाविरुद्ध नॉर्थम्प्टनशायरची टॉप ऑर्डर फ्लॉप झाली. गोलंदाजांना पोषक खेळपट्टीवर केवळ पृथ्वी शॉ याने शानदार फलंदाजी करून दाखवली. त्याने आपल्या ७८ धावांच्या खेळीमध्ये तब्बल १२ चौकार आणि १ षटकार ठोकला. पृथ्वी शॉ ने चांगली कामगिरी केली, पण त्याच्या वरच्या फळीतील इतर फलंदाज ढेपाळले. एमिलियो गे (१), रिकार्डो वास्कोनसेलोस (६), कर्णधार लुईस मॅकमॅनस (२) आणि जॉर्ज बार्टलेट (२७) हे वरच्या फळीतील फलंदाज स्वस्तात बाद झाले.
'वनडे कप'मधील पृथ्वीची आतापर्यंतची कामगिरी
पृथ्वी शॉने 'वनडे कप'मध्ये आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने ३ सामन्यांत ४१च्या सरासरीने १२५ धावा केल्या आहेत. यात त्याचा स्ट्राइक रेट १२३पेक्षा जास्त आहे. पृथ्वी शॉ याला या स्पर्धेत हळूहळू सूर गवसला आहे. त्यामुळे त्याने फिटनेसमध्ये सुधारणा केली आणि कामगिरीत सातत्य ठेवले तर तो नक्कीच टीम इंडियात पुनरागमन करू शकतो.