Join us  

Ruturaj Gaikwad Wasim Jaffer, IND vs WI 3rd T20 : मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला 'टीम इंडिया'त आता संधी देण्यात काहीच अर्थ नाही; मुंबईकर माजी क्रिकेटपटू वासिम जाफरचं रोखठोक विधान

भारताने वेस्ट इंडिजविरूद्ध टी२० मालिका २-० ने आधीच जिंकली आहे. परंतु, आज मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळण्यात येणार आहे. या सामन्यासाठी विराट कोहली आणि ऋषभ पंत यांना सुट्टी दिल्यामुळे संघात काही बदल अपेक्षित आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 4:12 PM

Open in App

Ruturaj Gaikwad Wasim Jaffer, IND vs WI 3rd T20 : भारताने वेस्ट इंडिजविरूद्धचे पहिले दोन टी२० सामने जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. त्यामुळे तिसरा सामना ही निव्वळ औपचारिकता असणार आहे. दुसऱ्या टी२० मध्ये रोहित, इशान आणि सूर्यकुमार अपयशी ठरल्यावर विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनीच दमदार अर्धशतकं ठोकत संघाला १८६ धावांपर्यंत मजल मारून दिली. त्यामुळे भारताने सामना व मालिका जिंकली. पण आता टी२० मालिका जिंकल्यामुळे तिसऱ्या टी२० साठी विराट कोहली आणि ऋषभ पंत यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे संघात काही बदल अपेक्षित आहेत. मराठमोळ्या ऋतुराजला आजच्या सामन्यासाठी संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. पण, ऋतुराजला संघात स्थान देण्यात काहीच अर्थ नाही, असं मत रणजी किंग मुंबईकर माजी क्रिकेटपटू वासिम जाफरने व्यक्त केलं आहे.

तिसऱ्या सामन्यात ऋषभ पंत संघातून बाहेर गेल्याने त्याच्या जागी इशान किशन यष्टीरक्षण करेल हे उघडच आहेत. पण इशान गेल्या दोन सामन्यात सलामीला फारसा चांगला न खेळल्याने त्याला पंतच्या जागी मधल्या फळीत फलंदाजी दिली जाऊ शकते. अशा वेळी सलामीसाठी ऋतुराज गायकवाडला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. IPL आणि सय्यद मुश्ताक अली स्पर्धा त्याने गाजवली होती. पण वासिम जाफरने मात्र याबाबत वेगळेच मत व्यक्त केलं आहे.

"इशान किशनला भारतीय संघ व्यवस्थापनाने सलामीवीर म्हणून आणखी एक सामन्यात संधी द्यायला हवी. तिसऱ्या टी२० सामन्यातदेखील इशाननेच रोहितसोबत सलामीला यायला हवं. ऋतुराज गायकवाडला संधी द्यायची असेल तर श्रीलंका विरूद्ध त्याला संपूर्ण मालिकेत संधी देता येईल. ऋतुराजला संधी द्यायची असेल तर मोठ्या कालावधीसाठी संधी देण्यात यायला हवी. ऋतुराजला 'टीम इंडिया'त आताच्या घडीला संधी देण्यात काहीही अर्थ नाही. एका सामन्यासाठी त्याला संधी देणं बरोबर होणार नाही", असं मत वासिम जाफरने व्यक्त केलं.

"ऋतुराज गायकवाडला एका सामन्यासाठी संघात संधी देण्यात काहीच अर्थ दिसत नाही. याउलट नव्या मालिकेच्या सुरूवातीपासूनच त्याला संधी मिळाली तर तो अधिक विश्वासाने मैदानात उतरेल. कारण त्याला या गोष्टीची खात्री असेल की तो संपूर्ण मालिका खेळणार आहे. त्यामुळे त्याचा विश्वास त्याच्या खेळीतूनही झळकेल", असं जाफरने स्पष्टीकरण दिलं.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजऋतुराज गायकवाडवासिम जाफरइशान किशन
Open in App