राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने अ गटात बार्बाडॉस विरूद्ध २० षटकांत १६२ धावा केल्या. मुंबईकर जेमिमा रॉड्रीग्जचं अर्धशतक आणि शफाली वर्माच्या २६ चेंडूत ४६ धावांची धडाकेबाज खेळी याच्या जोरावर भारताने बार्बाडॉसला १६३ धावांचे आव्हान दिले. भारताच्या स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, तानिया भाटीया यांसारख्या अनुभवी खेळाडूंनी निराशा केली. बार्बाडॉसच्या खेळाडूंनी शिस्तबद्ध गोलंदाजी करत त्यांनी वेळीच रोखलं.
भारतीय संघाकडून सलामीला शफाली वर्मा आणि स्मृती मानधना दोघी मैदानात उतरल्या. स्मृती मानधनाने चौकार लगावत सुरूवात चांगली केली होती. पण ७ चेंडूत ५ धावा काढून ती बाद झाली. त्यानंतर शफाली वर्माने जेमिमाच्या साथीने ७१ धावांची भागीदारी केली. शफाली अर्धशतकाच्या जवळ पोहोचली असतानाच, ती धावबाद झाली. तिने ७ चौकार आणि १ षटकार खेचला. त्यानंतर हरमनप्रीत कौर शून्यावर, तानिया भाटिया ६ धावांवर बाद झाली. पण दिप्ती शर्माने जेमिमाला चांगली साथ दिली. जेमिमाने नाबाद ५६ धावा केल्या. तिने ४६ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकार लगावला. तर दिप्तीने २८ चेंडूत ३४ धावा कुटल्या. बार्बाडॉसकडून शानिका ब्रूसने १, हायली मॅथ्यूजने १ आणि शकेरा सेल्मनने १ बळी टिपला.