मुंबईचा मराठमोळा क्रिकेटपटू आणि भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर याने २०२३ च्या वन डे विश्वचषक स्पर्धेपर्यंत टीम इंडियाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदाचा भार सांभाळावा, असं मत टीम इंडियात सध्या खेळत असलेल्या एका वरिष्ठ व अनुभवी क्रिकेटपटूने व्यक्त केले आहे. टी२० विश्वचषक २०२१च्या नंतर भारत अरूण यांनी टीम इंडियाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राहुल द्रविड यांची मुख्य प्रशिक्षकपदी तर भारताचा माजी गोलंदाज पारस म्हांबरे याची गोलंदजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. परंतु, एका सिनियर खेळाडूच्या मते खास कारणास्तव अजित आगरकरला या संघाचे गोलंदाजी प्रशिक्षकपद सोपवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
"भारतीय संघातील मोजक्या वरिष्ठ खेळाडूंपैकी एक असलेल्या आणि संघ व्यवस्थापनाच्या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एका सिनियर खेळाडूने अजित आगरकरच्या नावाची मागणी केली आहे. २०२३चा वन डे विश्वचषक होईपर्यंत अजित आगरकर याला संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक बनवण्यात यावे अशी मागणी त्या खेळाडूने केली आहे. पारस म्हांबरे हे एक उत्तम गोलंदाजी प्रशिक्षक आहेत. इंडिया ए, भारताचा अंडर १९ संघ आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील उदयोन्मुख गोलंदाजांना प्रशिक्षक देणं त्यांना नक्कीच जमतं. पण भारतीय संघातील गोलंदाजांना मार्गदर्शन व प्रशिक्षक देण्यासाठी अजित आगरकरसारखा एखादा अनुभवी गोलंदाजच प्रशिक्षकपदी असायला हवा असं त्या खेळाडूचं मत आहे", असं टीओआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेले वृत्त आहे.
अजित आगरकरची टीम इंडियातील कारकिर्द
अजित आगरकरने भारतीय संघासाठी २६ कसोटी, १९१ वन डे आणि ४ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. आपल्या यशस्वी कारकिर्दीत त्याने ५८ कसोटी बळी, २८८ वन डे गडी तर ३ टी२० आंतरराष्ट्रीय बळी टिपले. त्यानंतर सध्या काही वर्षांपासून अजित आगरकर समालोचक आणि क्रिकेट जाणकार या भूमिकेत चाहत्यांसमोर आला आहे.
पारस म्हांबरे यांची प्रशिक्षकपदाची कारकिर्द
पारस म्हांबरे यांनी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मधून लेव्हल-3 कोचिंग डिप्लोमाचे प्रमाणपत्र मिळवले आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त होण्यापूर्वी ते बंगाल, महाराष्ट्र, बडोदा आणि विदर्भ या संघांचे प्रशिक्षक होते. तसेच, त्यांनी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून IPL मध्ये मुंबई इंडियन्ससोबत चार वर्षे काम केले आहे. याशिवाय भारत A आणि U19 भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदाचीही धुरा त्यांनी सांभाळली आहे.