Join us  

मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक

इराणी चषक क्रिकेट; मुंबईची  शेष भारताविरुद्ध भक्कम धावसंख्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2024 6:10 AM

Open in App

लखनौ : रणजी विजेत्या मुंबईने निर्णायक इरणी चषक लढतीत बुधवारी भक्कम धावसंख्या उभारताना सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शेष भारत संघाविरुद्ध १३८ षटकांत ९ बाद ५३६ धावांची मजल मारली. मधल्या फळीतील स्टार फलंदाज सरफराझ खान याने २७६ चेंडूंत २५ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद २२१ धावा काढत शेष भारत संघाच्या गोलंदाजांचा घामटा काढला. 

सरफराझचे हे द्विशतक मुंबईसाठी ऐतिहासिक ठरले. इराणी चषक लढतीच्या ६४ वर्षांच्या इतिहासात मुंबईकडून द्विशतक झळकावणारा सरफराझ हा पहिला फलंदाज ठरला. त्याने या दमदार खेळीसह रामनाथ पारकर यांची १९७२ सालची नाबाद १९४ धावांची खेळी मागे टाकली. 

मुंबईने दुसऱ्या दिवशी ४ बाद २३७ धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. कर्णधार अजिंक्य रहाणेचे शतक केवळ तीन धावांनी हुकल्यानंतर सरफराझने मुंबईला भक्कम स्थितीत आणले. रहाणे २३४ चेंडूंत ७ चौकार व एका षटकारासह ९७ धावांवर बाद झाला. त्याला आपल्या खेळीत केवळ ९ धावांची भर घालता आली. 

शम्स मुलानी (५) झटपट परतल्यानंतर सरफराझने तनुष कोटियनसह किल्ला लढवताना सातव्या गड्यासाठी २५४ चेंडूंत १८३ धावांची जबरदस्त भागीदारी केली. प्रसिद्ध क्रिष्णाने कोटियनला त्रिफळाचीत करत ही जोडी फोडली. कोटियनने १२४ चेंडूंत ६ चौकारांसह ६४ धावा केल्या. पुढच्याच चेंडूवर प्रसिद्धने मोहित अवस्थीला (०) पायचीत पकडले; परंतु शार्दुल ठाकूरने ५९ चेंडूंत ४ चौकार व एका षटकारासह ३६ धावा करत सरफराझसोबत नवव्या गड्यासाठी ८९ चेंडूंत ७३ धावांची भागीदारी केली. खेळ थांबला तेव्हा सरफराझसह मोहम्मद जुनेद खान (०*) खेळपट्टीवर होता. मुकेश (४/१०९), यश दयाल (२/८९) व प्रसिद्ध (२/१०२) यांनी चांगली गोलंदाजी केली.

‘तो’ झेल सुटला आणि...सरफराझ खानने ९५ धावांवर खेळत असताना मानव सुतारला हवेत उंच फटका मारला; परंतु प्रसिद्ध क्रिष्णाला हा झेल घेता आला नाही. या मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेताना सरफराझने १५वे प्रथम श्रेणी शतक झळकावत ऐतिहासिक खेळी साकारली. हा सुटलेला झेल शेष भारताला चांगलाच महागडा ठरला.

संक्षिप्त धावफलक :मुंबई (पहिला डाव) : १३८ षटकांत ९ बाद ५३६ धावा (सरफराझ खान खेळत आहे. २२१, अजिंक्य रहाणे ९७, तनुष कोटियन ६४, श्रेयस अय्यर ५७; मुकेश कुमार ४/१०९, यश दयाल २/८९, प्रसिद्ध क्रिष्णा २/१०२.)

इराणी लढतीतील चौथा युवा द्विशतकवीर

यशस्वी जैस्वाल (शेष भारत)२१ वर्षे ६३ दिवसप्रवीण आमरे (शेष भारत)२२ वर्षे ८० दिवसगुंडप्पा विश्वनाथ (कर्नाटक)२५ वर्षे २५५ दिवससरफराझ खान (मुंबई)२६ वर्षे ३४६ दिवस

टॅग्स :सर्फराज खान