मुंबईकरांनी विजयी लय पकडली, कोलकाताचा १३ धावांनी पराभव

गतविजेत्या मुंबई इंडियन्सने अखेर विजयी लय पकडताना रविवारी झालेल्या महत्त्वपूर्ण सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सला १३ धावांनी नमवले. सूर्यकुमारचे शानदार अर्धशतक आणि हार्दिक पांड्याची निर्णायक अष्टपैलू खेळी मुंबईच्या विजयात मोलाचे ठरले. या चमकदार विजयासह मुंबईकरांनी बाद फेरी गाठण्याच्या आशा उंचावल्या असून ८ गुणांसह आपले पाचवे स्थान भक्कम केले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 01:22 AM2018-05-07T01:22:28+5:302018-05-07T01:22:28+5:30

whatsapp join usJoin us
 Mumbaikar win by 13 runs | मुंबईकरांनी विजयी लय पकडली, कोलकाताचा १३ धावांनी पराभव

मुंबईकरांनी विजयी लय पकडली, कोलकाताचा १३ धावांनी पराभव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- रोहित नाईक
मुंबई  - गतविजेत्या मुंबई इंडियन्सने अखेर विजयी लय पकडताना रविवारी झालेल्या महत्त्वपूर्ण सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सला १३ धावांनी नमवले. सूर्यकुमारचे शानदार अर्धशतक आणि हार्दिक पांड्याची निर्णायक अष्टपैलू खेळी मुंबईच्या विजयात मोलाचे ठरले. या चमकदार विजयासह मुंबईकरांनी बाद फेरी गाठण्याच्या आशा उंचावल्या असून ८ गुणांसह आपले पाचवे स्थान भक्कम केले आहे.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या मुंबईकरांनी २० षटकात ४ बाद १८१ धावांची आव्हानात्मक मजल मारली. यानंतर मुंबईकर गोलंदाजांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडताना कोलकाताला २० षटकात ६ बाद १६८ धावांवर रोखले. हार्दिकने फलंदाजीत नाबाद ३५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केल्यानंतर गोलंदाजीमध्ये टिच्चून मारा करताना ४ षटकात केवळ १९ धावा देत २ बळी मिळवले. याशिवाय मिचेल मॅक्क्लेनघन, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या आणि मयांक मारकंडे यांनीही प्रत्येकी एक बळी घेत हार्दिकला चांगली साथ दिली. त्याचवेळी, मुंबईला या वेळी खराब क्षेत्ररक्षणाचाही फटका बसला. कोलकाताच्या विजयाच्या आशा उंचावलेला रॉबिन उथप्पा वैयक्तिक ४ धावांवर असताना मयांकने त्याचा सोपा झेल सोडला. या जीवदानाचा फायदा घेत उथप्पाने ३५ चेंडूत ६ चौकार व ३ षटकारांसह ५४ धावांची झुंजार खेळी केली. तसेच नितिश राणा (२७ चेंडूत ३१ धावा) आणि कर्णधार दिनेश कार्तिक (२६ चेंडूत ३६) यांनीही कोलकातासाठी अप्रतिम खेळी केली. मात्र संघाला विजय मिळवून देण्यात त्यांची झुंज अपयशी ठरली. गतसामन्यात सर्वांचे लक्ष वेधलेला युवा फलंदाज शुभमान गिल या वेळी सलामीला उतरलेला, मात्र तो केवळ ७ धावा काढून परतला.
तत्पूर्वी सूर्यकुमार यादव - एविन लेविस या जोडीने केलेल्या ९१ धावांच्या तडाखेबंद सलामीच्या जोरावर मुंबईने आव्हानात्मक धावसंख्या उभारली. आंद्रे रसेलने लेविसला बाद करून ही जोडी फोडली. लेविसने २८ चेंडूत ५ चौकार व २ षटकारांसह ४३ धावांची खेळी केली. सूर्यकुमारने ३९ चेंडूत ७ चौकार व २ षटकारांसह ५९ धावांची शानदार खेळी केली. लेविसनंतर कर्णधार रोहित शर्मा (११) झटपट परतल्याने मुंबईच्या धावगतीवर परिणाम झाला. यानंतर स्थिरावलेला सूर्यकुमारही रसेलचा बळी ठरल्याने मुंबईचा डाव १५व्या षटकात ३ बाद १२७ धावा असा घसरला. तीन प्रमुख फलंदाज परतल्यानंतर मुंबईची धावगती मंदावली आणि एकवेळ दोनशेच्या दिशेने होणारी वाटचाल रोखली गेली. परंतु, हार्दिक पांड्याने २० चेंडूत ४ चौकार व एका षटकारासह नाबाद ३५ धावा काढत मुंबईला आव्हानात्मक मजल मारुन दिली. कृणाल पांड्या (११ चेंडूत १४ धावा) आणि जेपी ड्युमिनी (११ चेंडूत नाबाद १३) यांनीही छोटेखानी आक्रमक खेळी करत संघाच्या धावसंख्येत योगदान दिले. सुनील नरेन आणि रसेल यांनी प्रत्येकी २ बळी घेत मुंबईला रोखले.

संक्षिप्त धावफलक :
मुंबई इंडियन्स : २० षटकात ४ बाद १८१ धावा (सूर्यकुमार यादव ५९, एविन लेविस ४३, हार्दिक पांड्या नाबाद ३५; आंद्रे रसेल २/१२, सुनील नरेन २/३५.) वि.वि. कोलकाता नाइट रायडर्स : २० षटकात ६ बाद १६८ धावा (रॉबिन उथप्पा ५४, दिनेश कार्तिक नाबाद ३६, नितिश राणा ३१; हार्दिक पांड्या २/१९.)
 

Web Title:  Mumbaikar win by 13 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.