मुंबईकर यशस्वीने मिळवले ‘रॉयल’ यश

यंदाच्या आयपीएल लिलावात युवा खेळाडूंमध्ये सर्वांचे लक्ष वेधले ते मुळचा उत्तर प्रदेशचा, परंतु कर्मभूमी मुंबई असलेल्या यशस्वी जैस्वाल याने.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 04:45 AM2019-12-20T04:45:52+5:302019-12-20T04:46:16+5:30

whatsapp join usJoin us
Mumbaikar yashasvi gets 'Royal' success | मुंबईकर यशस्वीने मिळवले ‘रॉयल’ यश

मुंबईकर यशस्वीने मिळवले ‘रॉयल’ यश

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : यंदाच्या आयपीएल लिलावात युवा खेळाडूंमध्ये सर्वांचे लक्ष वेधले ते मुळचा उत्तर प्रदेशचा, परंतु कर्मभूमी मुंबई असलेल्या यशस्वी जैस्वाल याने. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा काढल्यानंतर १९ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही त्याने आपली छाप पाडली. त्याने वयाच्या १७व्या वर्षीच झारखंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावण्याचा पराक्रम केला. यानंतर त्याने सातत्याने मोठ्या खेळी केल्याने आयपीएलच्या सर्वच फ्रेंचाईजींचे लक्ष त्याच्याकडे वळले होते. यामध्ये बाजी मारली ती राजस्थान रॉयल्सने. एकेकाळी पाणीपुरी विकून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या यशस्वीसाठी तब्बल २.४० कोटींची बोली लावून राजस्थानने ‘रॉयल’ खेळी खेळली.
यशस्वीच्या या यशामागे त्याची कठोर मेहनत, जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्ती आहे. त्याच्या यशाला मिळत असलेल्या लखलखाटामागे मनाला हेलावून टाकणारी दुसरी बाजूही आहे. तीन वर्षे यशस्वी तंबूत राहिला, पाणीपुरी विकली. क्रिकेटपटू बनण्यासाठी त्याने जे हाल सोसले, ते डोळ्यात पाणी आणणारे आहेत. पण, त्याचा प्रवास हा अनेकांना प्रेरणा देणारा आहे.
मुंबईच्या आझाद मैदान येथील मुस्लीम युनायटेड क्लबच्या तंबूत ग्राऊंड्समन्ससोबत यशस्वी तीन वर्ष राहिला. एका डेअरीमध्ये तो काम करायचा, परंतु क्रिकेट खेळून पार थकून जायचा. त्यामुळे काम करताना त्याला झोप यायची. त्यामुळे डेअरी मालकाने त्याला कामावरून काढून टाकले होते. मात्र ‘यशस्वी’ क्रिकेटपटू बनण्याचे ध्येय उराशी बाळगून तो झटत राहिला. त्याच्या या झुंजार प्रवासात साथ लाभली ती क्रिकेट प्रशिक्षक ज्वाला सिंग यांची.
उत्तर प्रदेशातील भदोही गावातील हा युवा खेळाडू. यशस्वीच्या वडिलांचे गावात एक लहानसे दुकान आहे. क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यशस्वीने मुंबई गाठली. मुंबईत तो त्याच्या काकांकडे रहायचा, पण घर अत्यंत लहान असल्याने सर्वांना तेथे राहणे अवघड जायचे. त्यामुळे त्याच्या काकांनी मुस्लीम युनायटेड क्लबच्या मालकांकडे यशस्वीला क्लबमध्ये रहायला देण्याची विनंती केली. त्यानंतर यशस्वीने क्लबच्या तंबूत तीन वर्ष काढली. दखल घेण्याची बाब म्हणजे ही गोष्ट यशस्वीने आपल्या घरच्यांपासून लपवून ठेवली. कारण, त्यांना कळले असते, तर यशस्वीची क्रिकेट कारकिर्द तेथेच संपुष्टात आली असती.
यशस्वी आता १९ वर्षांखालील विश्वचषक खेळण्यास सज्ज असून भारतीय संघातील तो अत्यंत महत्त्वपूर्ण खेळाडू आहे.

यशस्वीचे वडील मुंबईला त्याच्यासाठी दरमहिन्याला पैसे पाठवायचे खरे, परंतु ते पुरेसे नव्हते. म्हणून यशस्वी आझाद मैदान येथील राम लीला येथे पाणीपूरी व फळ विक्री करायचा. अनेकदा तर तो रिकामी पोटी झोपला. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पूर्ण केलेल्या याच लढवय्या यशस्वीला राजस्थान रॉयल्सने २.४० कोटी रुपयांची किमत देऊन आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले.

Web Title: Mumbaikar yashasvi gets 'Royal' success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.