आजपासून शेष भारत आणि मध्य प्रदेश यांच्यात सुरू झालेल्या इराणी करंडक सामन्याचा पहिला दिवस मुंबईकर फलंदाज यशस्वी जयस्वाल याने गाजवला. यशस्वी जयस्वालने शेष भारताकडून खेळताना मध्य प्रदेशच्या गोलंदाजांची धुलाई करत शानदार द्विशतकी खेळी केली. या खेळीदरम्यान, त्याने ३० चौकार आणि ३ षटकांरांची आतषबाजी करत २५९ चेंडूत २१३ धावा कुटल्या. तसेच अभिमन्यू ईश्वरनच्या साधीने दुसऱ्या विकेटसाठी ३७१ धावांची झंझावाती भागीदारीही केली.
शेष भारत आणि मध्य प्रदेश यांच्यात सुरू झालेल्या इराणी करंडक सामन्यामध्ये शेष भारत संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र शेष भारताची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार मयांक अग्रवाल अवघ्या २ धावा काढून माघारी परतला. त्याला अवेश खानने बाद केले. त्यानंतर मात्र मध्य प्रदेशच्या गोलंदाजांना काही कमाल दाखवता आली नाही. सलामीवीर अभिमन्यू ईश्वरन आणि यशस्वी जयस्वाल यांनी चौफेर फटकेबाजी करत गोलंदाजांची धुलाई केली.
यशस्वी जयस्वालने २५९ चेंडूत ३० चौकार आणि ३ षटकारांसह २१३ धावांची खेळी केली. तर त्याला सुरेख साथ देणाऱ्या अभिमन्यू ईश्वरनने २४० चेंडूत १७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १५४ धावा काढल्या. या दोघांनीही दुसऱ्या विकेटसाठी विक्रमी ३७१ धावांची भागीदारी केली. मात्र तिसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यासाठी काही षटकांचा अवधी असताना हे दोघेही बाद झाले. यशस्वी जयस्वालला अवेश खानने बाद केले. तर ईश्वरन धावचित होऊन माधारी परतला. तिसऱ्या दिवसअखेर शेष भारत संघाने ३ बाद ३८१ धावांपर्यंत मजल मारली होती.