- स्वदेश घाणेकरमुंबई : भारताच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघाने शनिवारी थरारक सामन्यात बांगलादेशला नमवून सातव्यांदा आशिया चषक नावावर केला. 106 धावांचे माफल लक्ष्य बांगलादेश सहज पार करेल असे दिसत होते, परंतु मुंबईकर अथर्व अंकोलेकरने टीम इंडियाला थरराक विजय मिळवून दिला. बांगलादेशला विजयासाठी 8 धावांची आवश्यकता असताना टीम इंडियाच्या कर्णधाराने चेंडू अथर्वच्या हाती दिला. 33 व्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूवर दोन धावा निघाल्यानंतर बांगलादेश सहज जिंकेल अशी सर्वांना खात्री पटली होती. पण, अथर्वनं बांगलादेशच्या तोंडचा घास हिसकावला. त्यानं त्या षटकात दोन विकेट घेत भारताला 5 धावांनी विजय मिळवून दिला. हा सर्व थरार मुंबईत त्याची आई वैदेही अंकोलेकरही अनुभवत होती आणि मुलाच्या या दैदिप्यमान कामगिरीनं तिच्याही डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
अथर्वचे वडील विनोद हे स्वत: उत्कृष्ट क्रिकेट खेळायचे. मात्र त्यांना क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे प्राथमिक धडे गिरवलेल्या अथर्वने वयाच्या 9व्या वर्षी वडिलांचे छत्र गमावले.
वैदेही म्हणाल्या,''बांगलादेशला विजयासाठी 7 धावा आवश्यक असताना पहिल्याच चेंडूवर एक धाव निघाली. तेव्हा टीम इंडिया हरेल असे वाटले होते. पण, अथर्वने जिद्द सोडली नाही. त्यानं स्वतःला सिद्ध केलं. उद्या आल्यावर सेलिब्रेशन करू. त्याला नॉन वेज जास्त आवडतं. त्यामुळे मायदेशात आल्यावर त्याच्या आवडीचं नॉन व्हेज जेवणाची जंगी पार्टी करू."