ठळक मुद्देमोठं होऊन आपणही सचिन तेंडूलकर व्हावं अशी प्रत्येक खेळाडूची इच्छा आहे.मुंबईत अनेक क्रिकेट स्पोर्ट्स क्लब आहेत. त्त्याचप्रमाणे अनेक शाळांमध्येही क्रिकेटचे धडे शिकवले जातात. आणखी काही मुख्य क्रिकेटर आपल्या मुंबईतून जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत.
भारतीय क्रिकेट संघांत कायमच मुंबईचा मोलाचा वाटा राहत आला आहे. कारण मुंबईनेच अनेक दिग्गज खेळाडू भारतीय क्रिकेट टीमला दिले आहेत. मुंबईत अनेक क्रिकेट स्पोर्ट्स क्लब आहेत. त्त्याचप्रमाणे अनेक शाळांमध्येही क्रिकेटचे धडे शिकवले जातात. म्हणूनच खेळाडू घडले आणि नावारुपाला आले आहेत. क्रिकेटचा देव असलेला सचिन तेंडूलकरप्रमाणेच आणखी काही मुख्य क्रिकेटर आपल्या मुंबईतून जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत.
विजय मर्चंट
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिंमतीने खेळणाऱ्या विजय मर्चंट हे मुंबईतील पहिले क्रिकेट खेळाडू म्हणायला काहीच हरकत नाही. १९११ साली मुंबईत जन्म झाल्यावर त्यांनी १९३३ साली जागतिक स्तरावर क्रिकेट खेळायला सुरुवात केली. मात्र दुसऱ्या महायुद्धावेळी उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्यांचं करिअर चांगलंच धोक्यात आलं होतं. १९५५ पर्यंत त्यांनी भारतीय क्रिकेट टीमला साथ दिली. मात्र त्यानंतर त्यांच्या खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे क्रिकेटला रामराम ठोकावा लागला. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी केवळ १० टेस्ट मॅच जिंकल्या आहेत. मात्र त्यांच्या खेळण्याच्या एकंदरीत पद्धतीवरुन त्यांना आजही क्रिकेट खेळाडू मानाचं स्थान देतात. वयाच्या ७६ व्या वर्षी म्हणजेच १९८७ साली त्यांचा मृत्यू झाला.
रवी शास्त्री
शाळेपासूनच क्रिकेटचे धडे गिरवणाऱ्या रवी शास्त्री यांचा जन्म १९६२ साली मुंबईत झाला. गोलंदाज म्हणून क्रिकेटला सुरुवात केल्यानंतर त्यांनी बॅटींगमध्येही उत्तम कामगिरी केली. त्यानंतर हळू-हळू क्रिकेटमधले सर्व छक्केपंजे जाणून घेतल्यानंतर त्यांना अनेक क्रिकेटर ऑल राऊंडर म्हणूनही संबोधू लागले. त्यांच्या करिअरमधील सर्वात मोठा तुरा म्हणजे १९८५ साली त्यांना चॅम्पिअन ऑफ दि चॅम्पिअन हा पुरस्कार ऑस्ट्रेलियात देण्यात आला होता. मात्र १९९४ साली त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आता ते भारतीय क्रिकेट टीमचे मुख्य कोच आहेत आणि क्रिकेटसंदर्भात अनेक कार्यक्रमात ते निवेदन करताना दिसतात.
सचिन तेंडुलकर
मोठं होऊन आपणही सचिन तेंडूलकर व्हावं अशी आज प्रत्येक खेळाडूची इच्छा आहे. सचिन तेंडुलकरचा इतिहास कोणत्या खेळाडूपासून लपला असेल असं वाटत नाही. त्याच्या आयुष्यावर नुकताच एक चित्र-माहितीपटही येऊन गेला,त्यातून त्यांचं एकूण आयुष्य व करिअर प्रकाशात आला. सचिन तेंडूलकर यांचा जन्म १९७३ साली मुंबईत झाला. वयाच्या ११ व्या वर्षी त्यांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली आहे. दादरच्या शारदाश्रम विद्यालयात शिक्षण घेत असतानाच त्यांना रमाकांत आचरेकर यांच्याकडून क्रिकेटचे धडे मिळत होते. असं म्हणतात की प्रसिद्ध संगीत दिग्ददर्शक सचिन देव बर्मन यांच्या नावावरून त्यांचं नाव सचिन असं ठेवण्यात आलं आहे. वयाच्या १५ व्या वर्षी ते गुजरात संघाविरुद्ध सामन्यामध्ये १०० धावांमध्ये नाबाद राहिले होते. त्यावेळी असा विक्रम करणारा ते सर्वात तरुण खेळाडू मानला गेले. त्यानंतर वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी पाकिस्तानविरोधात कराचीमध्ये पहिली मॅच खेळले. वनडेमध्ये डबल सेन्चुरी करणारे सचिन तेंडूलकर हे पहिले खेळाडू आहेत. सचिन तेंडूलकर यांना आतापर्यंत पद्मविभूषण, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तर भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला भारतभूषणही त्यांना त्यांच्या निवृत्तीच्या दिवशी जाहिर झाला होता. त्यांना क्रिकेटमधील विक्रमादित्य किंवा मास्टरब्लास्टर म्हटलं जातं.
अजित वाडेकर
१९६६ ते १९७४ च्या काळात प्रसिद्ध असलेले मुंबईतील खेळाडू म्हणजे अजित वाडेकर. १९७१ ते १९७४ च्या दरम्यान ते इंडियन क्रिकेट टीमचे कर्णधारही होते. त्यांचा जन्म १९४१ साली मुंबईत झाला. अजित यांनी भरपूर अभ्यास करून इंजिनिअर व्हावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. मात्र त्यांना क्रिकेटचेच वेध लागले होते. १९५९ साली त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळायला सुरुवात केली. तर १९६६ मध्ये जागतिक स्थरावर खेळण्यास सुरुवात केली. त्यांच्याकाळात उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांचा तिसरा क्रमांक लागत असत. १९६६ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळायला सुरुवात केल्यानंतर वर्षभरातच म्हणजे १९६७ साली त्यांना अर्जून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर १९७२ साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला. १९९०च्या काळात ते इंडियन क्रिकेट टीमचे व्यव्यस्थापकही राहिलेले आहेत. कसोटी खेळाडू, कर्णधार, कोच, मॅनेजर अशा विविध भूमिका त्यांना आजवर सांभाळलेल्या आहेत.
सुनिल गावसकर
ओपनींग बॅट्समन म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुनिल गावसकर यांचा जन्म १९४९ साली मुंबईत झाला. १० हजार रन करणारे हे पहिले भारतीय क्रिकेटर राहिलेले आहेत. १९०७० ते १९८० दरम्यान त्यांनी त्यांची कारकिर्द गाजवली आहे. गावसकरचे वडील आणि काका हे चांगले क्रिकेटपटू होते. त्याचे एक मामा माध्व मंत्री ह्यांनी ही कसोटी सामन्यात भाग घेतला होता. शिवाय त्यांचे दोन्ही आजोबा आणि आई ह्यांना क्रिकेटविषयी विशेष प्रेम होते. क्रिकेटमय वातावरणात वाढल्यामुळे सुनिल यांना लहानपणापासूनच क्रिकेटची उत्कट आवड निर्माण झाली. घरातील सर्व मंडळींनी त्याला क्रिकेट खेळण्यास मनापासून प्रोत्साहन दिले. आपण चांगला फलंदाज बनणार, हे त्यांनी प्रथमपासून ठरविले होते. प्रसिद्ध प्रशिक्षक कमल भांडारकर यांचे त्यांना मार्गदर्शन मिळाले. पद्मश्री आणि पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले असून मुंबई क्रिकेट पत्रकार संघातर्फेही त्यांना जीवनगौरव देण्यात आला आहे.
Web Title: mumbai's contribution to Indian cricket team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.