रोहित नाईक
मुंबई : मुंबई इंडियन्सने संपूर्ण सामन्यावर मिळवलेली पकड १८ व्या षटकात गमावली आणि दिल्ली कॅपिटल्सने ४ गड्यांनी बाजी मारली. यासह मुंबईने सलग दहाव्या सत्रात आयपीएलमध्ये सलामीचा सामना गमावला. याआधी २०१२ मध्ये मुंबईने विजयी सलामी दिली होती. रोहितच्या नेतृत्वात मुंबईला कधीही पहिला सामना जिंकण्यात यश आलेले नाही.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत दिल्लीने मुंबईला ५ बाद १७७ धावांत रोखले. दिल्लीने हे लक्ष्य १८.२ षटकांतच ६ बाद १७९ धावा करून गाठले. दिल्लीने पाचव्या षटकातच आघाडीचे तीन फलंदाज गमावले. ललित यादवने अक्षरसह सातव्या गड्यासाठी ३० चेंडूत नाबाद ७५ धावांची भागीदारी केली. दिल्लीला तीन षटकांत २८ धावांची गरज असताना अक्षर-ललित यांनी सॅम्सला ३ षटकार आणि एका चौकारासह २४ धावा चोपल्या.
निकाल स्पष्ट केला.
ललितने ३८ चेंडूंत नाबाद ४८, तर अक्षरने १७ चेंडूंत नाबाद ३८ धावांची निर्णायक खेळी केली. बसिल थम्पीने ३, तर मुरुगन आश्विनने २ बळी घेत चांगला मारा केला. दोघांनी एकाच षटकात दोन बळी घेत मुंबईला वर्चस्व मिळवून दिले होते.
त्याआधी, कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी मुंबईला भक्कम सुरुवात करून दिली. रोहितने आक्रमणाची सूत्रे हाती घेत दिल्लीवर हल्ला चढवला. तो बाद झाल्यानंतर मुंबईची मधली फळी कोसळली. ५५ धावांत ४ फलंदाज गमावल्याने मुंबईची बिनबाद ६७ धावांवरून ४ बाद १२२ अशी घसरगुंडी उडाली; परंतु इशानने मुंबईला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. त्याच्या जोरावर मुंबईने अखेरच्या ५ षटकांत ५९ धावा कुटल्या. दिल्लीकडून पहिल्यांदाच खेळत असलेल्या कुलदीप यादवने मुंबईच्या फलंदाजीला सुरुंग लावताना १८ धावांत ३ बळी घेतले. खलील अहमदनेही २ बळी घेत त्याला चांगली साथ दिली.
—————
महत्त्वाचे :
- सलग तीन वेळा अर्धशतकी खेळी करणारा इशान किशन दुसरा भारतीय फलंदाज ठरला. याआधी असा पराक्रम सचिन तेंडुलकरने केला आहे.
Web Title: Mumbai's losing streak continues, 10th consecutive defeat
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.