अजिंक्य रहाणे भारतीय संघाबाहेर का? असा प्रश्न तुम्हाला त्याची देशांतर्गत क्रिकेटमधील खेळी बघून पडू शकतो. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत तर मराठमोळ्या अजिंक्य रहाणेनं अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. २३० धावांचा विक्रमी पाठलाग करताना ५४ चेंडूत ९५ धावा करणाऱ्या अजिंक्य रहाणेनं विदर्भ संघाविरुद्धच्या क्वार्टर फायनलमध्ये ४५ चेंडूत ८४ धावांची स्फोटक खेळी केली. या खेळीत त्याने आपल्या भात्यातील एक से बढकर एक शॉट दाखवून दिला. अनुभवी बॅटरच्या बॅटमधून निघालेला स्कूप शॉट तर खूपच भारी होता.
४५ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ८४ धावांची दमदार खेळी
कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या अलुरच्या मैदानात रंगलेल्या उपांत्यपूर्व सामन्यात विदर्भ संघानं पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित २० षटकात २२१ धावा करत मुंबईसमोर २२२ धावांचे टार्गेट सेट केले. या धावाचा पाठलाग करताना अनुभवी अजिंक्य रहाणेनं युवा पृथ्वी शॉसोबत संघाला धमाकेदार सुरुवात करून दिली. पृथ्वी ४९ धावा करून माघारी फिरल्यावर अजिंक्य रहाणेनं या स्पर्धेतील आणखी एक अर्धशक पूर्ण केले. यश ठाकूरनं त्याच्या खेळीला ब्रेक लावण्याआधी अजिंक्य रहाणेनं ४५ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ८४ धावांची दमदार खेळी करत चेस मास्टर असल्याचा सीन दाखवून देत पुन्हा एकदा मुंबईसाठी सामना सेट केला.
फिफ्टी प्लसचा खास 'चौकार'
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील पा डावात अजिंक्य रहाणेनं चार वेळा ५० पेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे. महाराष्ट्र विरुद्धच्या सामन्यात अजिंक्यनं ३४ चेंडूत ५२ धावांची धमाकेदार खेळी केली होती. केरळा विरुद्ध त्याच्या भात्यातून ३५ चेंडूत ६८ धावांची दमदार खेळी पाहायला मिळाली. सर्विसेस विरुद्ध तो फक्त १८ चेंडूत २२ धावा करून परतला होता. पण त्यानंतर पुन्हा त्याने दमदार कमबॅक केले. आंध्र प्रदेश विरुद्धच्या सामन्यात त्याचं शतक अवघ्या ५ धावांनी हुकले. या सामन्यात त्याने ५३ चेंडूत ९५ धावांची खेळी करत मुंबई संघाला विक्रमी विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्यानंतर आता विदर्भ संघाविरुद्ध त्याने ४५ चेंडूत ८४ धावांची खेळी करत संघाला सेमी फायनलचा मार्ग सहज सोपा केला.