मुंबई - मुंबईचा टॅलेंटेड ओपनर पृथ्वी शॉ लवकरच राष्ट्रीय निवड समितीला आपली दखल घ्यायला भाग पाडणार आहे. अवघ्या 18 वर्षांच्या पृथ्वी शॉ ने यंदाच्या रणजी मोसमात आपला दबदबा निर्माण केला आहे. त्याने रणजी क्रिकेट स्पर्धेत आणखी एक दमदार शतक झळकावले आहे. ग्रुप सी मध्ये शुक्रवारी आंध्रप्रदेश विरुद्धच्या सामन्यात खेळताना पृथ्वी शॉ ने 114 धावांची खेळी साकारली. अयाप्पाने त्याला प्रणीथकरवी झेलबाद केले.
फर्स्ट क्लास क्रिकेट करीयरमधील पृथ्वीचे हे पाचवे शतक आहे. पृथ्वी शॉ फर्स्ट क्लासचे आतापर्यंत फक्त सात सामने खेळला आहे. त्यात त्याचे हे पाचवे शतक आहे. रणजी स्पर्धेत पृथ्वीने आतापर्यंत चार शतके झळकवली आहेत. आंध्रपदेश विरुद्धच्या सामन्यात पृथ्वीच्या शतकामुळे मुंबईच्या डावाला आकार मिळाला.
मुंबईच्या पाच बाद 193 धावा झाल्या आहेत. सिद्धेश लाड अर्धशतक झळकवून नाबाद आहे. या दोघांचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांनी निराशा केली. पृथ्वी शॉ ने अंडर-14, अंडर-16 आणि अंडर-19 मध्ये त्याने मुंबईचे प्रतिनिधीत्व केले आहे. मुंबईचा संघ मागच्याच आवडयात बडोद्याविरुद्ध 500 वा रणजी सामना खेळला. त्यावेळी पृथ्वी शॉ कडून ब-याच अपेक्षा होत्या. पण तो शून्यावर बाद झाला. पण दुस-या डावात त्याने (56) अर्धशतक झळकवून कसर भरुन काढली.
शालेय क्रिकेटमध्ये पृथ्वी शॉ ने एकाच सामन्यात फटकावल्या 546 धावा एमआयजी क्रिकेट क्लबकडून खेळणारा पृथ्वी शॉ सर्वप्रथम नोव्हेंबर 2013 मध्ये चर्चेत आला. मुंबईच्या शालेय क्रिकेटमध्ये प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा-या हॅरिस शिल्डमध्ये त्याने एकटयाने 546 धावा फटकावण्याचा विक्रम केला होता. हा रेकॉर्ड कल्याणच्या प्रणव धनावडेने 4 जानेवारी 2016 रोजी मोडला. कल्याणच्या के.सी.गांधी हायस्कूलकडून खेळताने प्रणवने 323 चेंडूत नाबाद 1009 धावा तडकावल्या होत्या. तीन बाद 1465 धावांवर के.सी.गांधी स्कूलने आपला डाव घोषित केला होता. हा एक विश्वविक्रम आहे. प्रतिस्पर्धी आर्य गुरुकुल शाळेचा पहिल्या डाव 31 तर दुसरा डाव 52 धावांवर संपुष्टात आला होता.