मुंबई : रेल्वेकडून मुंबईच्या संघाला काल मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीने मुंबईच्या संघावर खरमरीत टीका केली आहे. ही जहरी टीका करत असताना कांबळीने मुंबईच्या संघाची हवाच काढून टाकली आहे.
मुंबईच्या संघावर या सामन्यातील पहिल्या डावात ११४ धावांवर सर्वबाद होण्याची नामुष्की ओढावली. त्यानंतर मुंबईवर दहा विकेट्सने पराभूत होण्याची नामुष्की ओढावली. त्यानंतर मुंबईवर या सामन्यात दहा विकेट्सने पराभूत होण्याची नामुष्की ओढावली. त्यामुळे मुंबईच्या संघावर जोरदार टीका सुरु झाली आहे.
कांबळीने ट्विटरच्या माध्यमातून मुंबईच्या संघावर टीका केली. कांबळी म्हणाला की, " मुंबईच्या संघाने मस्त डबा घातला. मुंबईच्या संघाकडून फार वाईट कामगिरी पाहायला मिळाली. श्रेयस अय्यर आणि शिवम दुबे हे दोघेही सध्या संघात नाहीत. पण यापुढे जेव्हा शक्य असेल तेव्हा संघाची चांगली कामगिरी पाहायला आवडेल."
रेल्वेने शुक्रवारी येथे एलीट ‘ब’ गटातील सामन्यात तीन दिवसांच्या आत मुंबईवर १० गडी राखून मात करीत या रणजी हंगामातील आतापर्यंतच्या सर्वात खळबळजनक निकालाची नोंद केली. मुंबईचा पहिला डाव ११४ धावांत गुंडाळल्यानंतर कर्णधार कर्ण शर्मा याच्या नाबाद ११२ धावांच्या बळावर रेल्वेने पहिल्या डावात १५२ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. त्यानंतर हिमांशू सांगवान याने ६० धावांत घेतलेल्या ५ बळींच्या जोरावर रेल्वेने मुंबईचा दुसरा डाव १९८ धावांत गुंडाळला.अजिंक्य रहाणे दुसऱ्या डावात अपयशी ठरला.
४१ वेळेसचा रणजी चॅम्पियन मुंबईने तिसºया दिवशी ३ बाद ६४ या धावसंख्येवरून सुरुवात केली. परंतु रहाणे कालच्या ३ धावांत आज फक्त ५ धावांची भर घालू शकला. कर्णधार सूर्यकुमार यादव (९४ चेंडूंत ६५ धावा) आणि अनुभवी आदित्य तारे (१४ धावा) यांनी ६४ धावांची भागीदारी करीत मुंबईचा डाव सावरला. पहिल्या डावात ६ गडी बाद करणारा रेल्वेचा गोलंदाज प्रदीप टी. याने तारे याला बाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर रेल्वेने सूर्य आणि शम्स मुलानी (१) यांना सलग बाद केले. तथापि, शार्दुल ठाकूर (२१ धावा) आणि आकाश पारकर (नाबाद ३५) यांनी झुंजार फलंदाजी केली. त्यामुळे मुंबईचा डावाने पराभव टळला. उपहारानंतर ठाकूरदेखील बाद झाला. त्यामुळे मुंबईची ८ बाद १६४ अशी स्थिती झाली आणि ते १२ धावांनी पुढे होते.वेगवान गोलंदाज तुषार पांडे १५ चेंडूंनंतर बाद झाला. पारकरच्या खेळीने मुंबईने रेल्वेला विजयासाठी ४७ धावांचे लक्ष्य दिले. सलामीवीर मृणाल देवधर (नाबाद २७) आणि प्रथम सिंह (नाबाद १९) यांनी रेल्वेला १० गडी राखून विजय मिळवून दिला.