लखनौ - भारतीय संघाच्या २०११ च्या वर्ल्डकप विजयातील हीरो ठरलेला क्रिकेटपटू मुनाफ पटेल अडचणीत सापडला आहे. उत्तर प्रदेश भूसंपादन विनियामक प्राधिकरण कडून जारी करण्यात आलेल्या वसुली प्रमाणपत्राच्या आधारावर गौतम बुद्ध नगर जिल्हा प्रशासनाने माजी क्रिकेटपटू मुनाफ पटेलची दोन बँक खाती गोठवून ५२ लाख रुपये वसूल केले आहेत. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. मुनाफ पटेल निवास प्रमोटर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा संचालक आहे. यूपी रेरा कंपनीने गुंतवणूकदारांची रक्कम परत न केल्याने ही कारवाई केली आहे.
निवास प्रमोटर्स प्रायव्हेट लिमिटेड ने २०१७ मध्ये यूपीरेरा मध्ये एक प्रकल्प नोंद केला होता. मात्र हा प्रकल्प निर्धारित वेळेवर पूर्ण झाला नाही. तेव्हा यूपी रेराने बिल्डरला आणखी एक संधी देत मुदत वाढवून दिली. मात्र तरीही प्रकल्प पूर्ण झाला नाही. दरम्यान, यावर्षी या कंपनीची नोंदणीही संपुष्टात आली. आता यूपी रेराच्या आरसीवरून बिल्डरविरुद्ध कारवाई होत आहे. त्याचाच भाग म्हणून कंपनीचा संचालक मुनाफ पटेल याची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. त्यांनी सांगितले की उर्वरित रक्कम वसूल करण्यासाठी अशाचप्रकारे कारवाई होत आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, क्रिकेटपटू मुनाफ पटेल हा या कंपनीचा संचालक आहे. त्याच्या नोएडा आणि गुजरातमधील अँक्सिस बँकेच्या दोन शाखांमध्ये असलेली खाती गोठवून ही कारवाई करण्यात आली आहे. दोन्ही बँक खात्यामधून सुमारे ५२ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. त्यांनी सांगितले की बिल्डर विरोधात यापुढेही कारवाई सुरूच राहील.