हितेंन नाईक पालघर : तालुक्यातील मुरबे येथील सिद्धेश्वरी उर्फगौरी हितेंन पागधरे या १६ वर्षीय तरु णीने आपल्यामधील गुणवत्ता सिद्ध केल्याने यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून मुबई क्रिकेट असोसिएशनमध्ये तिची निवड करण्यात आली आहे. तालुक्यातील आयोजित महिला क्रि केट स्पर्धेत चौकार आणि षटकारांनी आपली एकावर एक शतके साजरी करणाऱ्या सिद्धेश्वरीने आपल्यातील गुणवत्तेच्या जोरावर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या टीममध्ये यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून आपले स्थान निर्माण करण्यात यश मिळविले आहे.
मूळ सातपाटीच्या पण व्यवसायाच्या निमित्ताने मुरबे येथे स्थायिक झालेल्या ज्योती आणि हितेन पागधरे या दाम्पत्याची सिद्धेश्वरी ही जेष्ठ कन्या. आपल्या शालेय जीवनात मुरबे येथे मुलांच्या क्रिकेट मॅचमध्ये सहभागी होतांना स्क्वेअर कट, स्ट्रेट ड्राइव्ह, हुक, पूल आदी फटके ती सहजरित्या मारत असल्याने अनेकांनी तिला चांगल्या मार्गदर्शकाची गरज असल्याचा सल्ला तिच्या वडिलांना दिला. आलेवाडी येथे झालेल्या ८ ओव्हरच्या ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट मॅचमध्येही तिने षटकार, चौकारांची आतषबाजी करीत दणदणीत शतक ठोकले, असेच दुसरे शतक तिने बोईसरच्या आंबट-गोड मैदानावर झालेल्या मॅचमध्ये ठोकले आणि तिची मॅच असल्यावर तिच्या चाहत्यांची गर्दी मैदानाभोवती वाढू लागली. तिच्यात गुणवत्ता असल्याने तिला टेनिसबॉल क्रिकेटऐवजी सिझन बॉल क्रिकेटकडे वळविण्याचा सल्ला तिच्या वडिलांना अनेकांनी दिल्या नंतर तिच्या वडिलांनी तिला सिझन क्रिकेटकडे वळविण्यासाठी टाटा स्टीलच्या ग्राउंडवर आणले. जगदीश नाईक, झाकिर शेख, भरत चामरे या प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली तिचा खडतर सराव सुरू झाला. सरावा दरम्यान प्रशिक्षक नाईक यांनी तिला यष्टीरक्षण करण्याचा सल्ला दिला.
शिवाजी पार्कयेथे झालेल्या शालेय स्पर्धेतील उपांत्य फेरीतल्या मॅचमध्ये सिद्धेश्वरीने चांगले यष्टीरक्षण करून ृसंघाला विजयासाठी हव्या असणाऱ्या धावसंख्येचा पाठलाग करतांना नाबाद २५ धावा झळकावून फलंदाजीतील चुणूक दाखवून आपल्या संघाला विजयी केल्याचे तिने लोकमतला सांगितले. विरार येथे मुंबई क्रिकेट असोसिएशन टीमसाठी झालेल्या सराव स्पर्धेत एकूण १०४ धावासह यष्टीरक्षणात सिलेक्टर्सना तिने प्रभावित केले.