मुंबई: भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू मुरली विजयने अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. निवृत्तीची घोषणा केल्याच्या अवघ्या काही दिवसांतच मुरली विजय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुरली विजयने यावेळी ट्विटच्या माध्यमातून संजय मांजरेकरांवर निशाणा साधला आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.
दरम्यान, याची सुरूवात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी समालोचनादरम्यान झाली होती. टीव्हीवर कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय भूमीवर सर्वोत्तम खेळी करणाऱ्या खेळाडूंची यादी प्रदर्शित केली होती. या यादीत मुरली विजयचे स्थान पहिल्या क्रमांकावर होते. तर चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या नावांची नोंद होती. ज्याबद्दल संजय मांजरेकर थोडे आश्चर्यचकित दिसले.
संजय मांजरेकांनी दिलेली प्रतिक्रिया मुरली विजयला खटकली आणि त्याने ट्विटच्या माध्यमातून निशाणा साधला. मुरली विजयने ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "मुंबईचे काही माजी खेळाडू साउथला कधीच दाद देऊ शकत नाहीत."
विजयच्या या ट्विटवर अद्याप संजय मांजरेकरांची प्रतिक्रिया आलेली नाही. अशा स्थितीत मुरली विजयच्या या ट्विटवर संजय मांजरेकर प्रतिक्रिया देणार की नाही याची चाहत्यांना उत्सुकता आहे. खरं तर मुरली विजयने 30 जानेवारी 2023 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. डिसेंबर 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीत तो देशाकडून शेवटचा खेळला होता.
मुरली विजयने भारताकडून 61 कसोटी, 17 वन डे आणि 9 ट्वेंटी-20 सामने खेळले. 61 कसोटी सामन्यांमध्ये विजयने 38.28 च्या सरासरीने 3982 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 12 शतके आणि 15 अर्धशतके झळकावली. त्याने 17 वन डे मध्ये 339 धावा आणि सात ट्वेंटी-20 सामन्यांत 169 धावा केल्या आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"