कोलंबो : ‘श्रीलंका क्रिकेट संघाकडून सातत्याने निराशाजनक कामगिरी होत आहे. लंकेचा सध्याचा संघ गेल्या काही वर्षांपासून विजय कसा मिळवायचा, हेच विसरला आहे. देशातील क्रिकेट सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे,’ असे मत व्यक्त करीत श्रीलंकेचा माजी दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन याने आपली निराशा व्यक्त केली. मंगळवारी भारताविरुद्ध सामना हातात असूनही श्रीलंकेला पराभव पत्करावा लागला. २७५ धावांचा पाठलाग करताना भारताची ७ बाद १९३ धावा अशी अवस्था करीत लंकेने पकड मिळविली होती.
मात्र, दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमार यांनी नाबाद अर्धशतकी भागीदारी करीत लंकेचा विजय हिसकावला. मुरलीधरनने सांगितले की, ‘मी याआधीही सांगितले आहे की, श्रीलंका संघ विजय मिळविण्याचे विसरला आहे. गेल्या काही वर्षांत सामना कसा जिंकायचा, हेच त्यांच्या स्मरणात राहिलेले नाही. सध्या त्यांच्यापुढे कठीण परिस्थिती असून, विजय कसा मिळवायचा, हे त्यांना माहीत नाही. मी आधीच सांगितले होते की, लंकेने १०-१५ षटकांत ३ बळी मिळविले, तर भारताला संघर्ष करावा लागेल आणि तसेच झालेही; पण दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमार यांच्या शानदार झुंजार खेळाच्या जोरावर भारताने बाजी मारली.’
मुरलीधरन पुढे म्हणाला की, ‘श्रीलंकेने या सामन्यात काही चुका केल्या. वानिंदू हसरंगाची षटके यजमानांनी उगाच राखून ठेवली. त्याला सुरुवातीलाच गोलंदाजी देऊन, बळी घेण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे होता. जर, त्यांनी चहर किंवा भुवनेश्वरचा बळी मिळविला असता, तर खालच्या फलंदाजांना प्रत्येक षटकामध्ये ८-९ धावा काढणे सोपे गेले नसते.’