musheer khan accident : मुंबईकर खेळाडू मुशीर खान अपघातामुळे इराणी चषकातून बाहेर झाला आहे. इराणी चषकाला सुरुवात होण्यापूर्वी मुंबईच्या संघाला मोठा झटका बसला. कानपूरहून लखनौकडे जात असताना मुशीरच्या वाहनाला अपघात झाला. अपघातावेळी मुशीरसोबत त्याचे वडील तथा प्रशिक्षक नौशाद खान हे देखील होते. मुशीरचा मोठा भाऊ सर्फराज खानने भारताच्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. अपघातानंतर नौशाद आणि मुशीर यांनी व्हिडीओ शेअर करत आपली पहिली प्रतिक्रिया देताना सर्वांचे आभार मानले.
मुशीर खानचे वडील नौशाद खान यांनी व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले की, नवीन आयुष्य दिल्याबद्दल मी अल्लाहचे आभार मानू इच्छितो. आमच्यासाठी ज्यांनी प्रार्थना केली त्या सर्वांचे आभार मानतो. एनसीए आणि बीसीसीआयने केलेल्या मदतीसाठी त्यांचा देखील ऋणी आहे. जे मिळाले त्याचे आभार आणि जे मिळाले नाही त्याची वाट पाहू... हेच तर जीवन आहे. तर मुशीरने सांगितले की, नवीन आयुष्य मिळाल्याने अल्लाहचे खूप आभार. दरम्यान, १ ते ५ ऑक्टोबरदरम्यान मुंबई संघ शेष भारत संघाविरुद्ध इराणी चषकासाठी भिडेल. तसेच मुशीरची तब्येत ठीक असून, प्रवासासाठी योग्य झाल्यावर पुढील मदतीसाठी त्याला मुंबईला नेण्यात येईल, अशी माहिती बीसीसीआयने दिली होती.
मुंबईचा संघ -अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सूर्यांश शेडगे, हार्दिक तोमर, सिद्धांत अधातराव, शम्स मुलानी, तनुष कोटियन, हिमांशू सिंग, शार्दुल ठाकूर, मोहित अवस्थी, जुनेद खान, रॉयस्टन डायस.
शेष भारत संघ - ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू ईस्वरन, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, इशान किशन, मानव सुथार, सारंश जैन, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार, यश दयाल, रिकी भुई, शाश्वत रावत, खलील अहमद, राहुल चाहर.