ICC Under 19 World Cup ( Marathi News ) मुंबईचे नौशाद खान कुटुंबीयांच्या घरी मागील आठवडाभर आनंदाचं वातावरण आहे. मोठा मुलगा सर्फराज खान याचे राष्ट्रीय संघात सिलेक्शन झाले, तर दुसरीडे लहान मुलगा मुशीर हा १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. मुशीर खानने आज आणखी एका शतकासह चमक दाखवली आहे. मुंबईच्या १८ वर्षीय फलंदाजाने स्पर्धेतील दुसरे शतक झळकावले. त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई करताना १२६ चेंडूंत ३ षटकार व १३ चौकारांच्या मदतीने १३१ धावांची खेळी केली.
१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत दोन शतकं झळकावणारा शिखर धवननंतर मुशीर दुसरा भारतीय फलंदाज आहे. या स्पर्धेच्या २००४ च्या आवृत्तीत शिखर धवनने ३ शतकं झळकावली होती. तेव्हा त्याने ७ डावांत ८४.१६च्या सरासरीने ५०५ धावा केल्या होत्या. पाकिस्तानचा बाबर आजम यानेही १९ वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये दोन शतकं झळकावण्याचा पराक्रम केला आहे. मुशीरने या वर्ल्ड कपमध्ये ४ डावांत ८१.२५च्या सरासरीने ३२५ धावा केल्या आहेत. मुशीरने आजच्या शतकापूर्वी २५ जानेवारीला आयर्लंडविरुद्ध ११८ धावांची खेळी केली होती.
सुपर सिक्स ग्रुप १ मधील पहिल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना आज ८ बाद २९५ धावा केल्या. सलामीवीर आदर्श सिंगने ५२, कर्णधार उदय सहारनने ३४ धावा केल्या.