Join us  

छोटा पॅक बडा धमाका! मास्टर ब्लास्टरच्या विक्रमाला सुरुंग; Musheer Khan टीम इंडियात दिसणार?

पदार्पणातील क्लास खेळीसह पठ्ठ्यानं विक्रमादित्य सचिन तेंडुलकरचा विक्रम काढला मोडीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2024 2:33 PM

Open in App

दुलिप करंडक स्पर्धेत पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या १९ वर्षीय पोरानं मोठा धमाका केला आहे. मुशीर खान यानं भारत 'ब' संघाकडून खेळताना भारत 'अ' विरुद्धच्या सामन्यातील पहिल्या डावात १८१ धावांची धमाकेदार खेळी केली. त्याचे द्विशतक अवघ्या १९ धावांनी हुकलं. पण या खेळीसह एक खास विक्रम त्याने आपल्या नावे केलाय.  क्रिकेटचा देव आणि विक्रमादित्य अशा वेगवेगळ्या उपमा दिल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा विक्रम त्याने मोडीत काढला आहे.  

पदार्पणातील सामन्यात संघ अडचणीत असताना झुंझार खेळी

दुलिप करंडक स्पर्धेतील भारत 'अ' विरुद्ध भारत 'ब' यांच्यातील सामना बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरु आहे. भारत 'अ' संघाचा कर्णधार शुबमन गिल याने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारत 'ब' संघाची सुरुवात खूपच खराब झाली होती. यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत, सरफराज खान आणि  वॉशिंग्टन सुंदर ही टीम इंडियात दिसलेली मंडळी फेल ठरली. संघ अडचणीत असताना सरफराज खानचा भाऊ मुशीर खान यानं किल्ला लढवला. पदार्पणात त्याने पहिल्याच दिवशी शतक साजरे केले. 

द्विशतक हुकल, पण मास्टर ब्लास्टर सचिनला माग टाकलं

पहिल्या दिवशी १०५ धावांवर नाबाद असणाऱ्या मुशीरनं दुसऱ्या दिवशीही दमदार बॅटिंग केली. तो द्विशतक अगदी आरामात करेल, असे वाटत होते. पण कुलदीप यादव त्याला  चकवा देण्यात यशस्वी ठरला. मुशीरनं नवदीप सैनीच्या साथीनं ८ व्या विकेटसाठी २०५ धावांची भागीदारी रचली. द्विशतक हुकलं असलं तरी वयाच्या १९ वर्षी १८१ धावांच्या इनिंगसह त्याने एक नवा इतिहास रचला आहे. त्याच्यासमोर मास्टर ब्लास्टरचा विक्रम मागे पडलाय.

पदार्पणात सर्वोच्च धावसंख्या करणाऱ्या खास क्लबमध्ये सचिनच्या एक पाऊल पुढे गेला मुशीर

दुलिप करंडक स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यात सर्वोच्च धावसंख्या करणाऱ्या युवा खेळाडूंच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. या क्रमांकावर आधी सचिन तेंडुलकर होता. ज्याने १९९१ मध्ये पदार्पणाच्या सामन्यात १५९ धावांची खेळी केली होती. मुशीर खानच्या १८१ च्या इनिंगमुळे सचिनची आता चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे.  दुलिप करंडक स्पर्धेत २० वर्षांपेक्षा कमी वयात पदार्पणात सर्वोच्च धावसंख्या नोंदवण्याचा विक्रम हा बाबा अपराजित याच्या नावे आहे. त्याने २१२ धावांची खेळी केली होती. त्यानंतर यश धुलचा नंबर लागतो. त्याने १९३ धावांची खेळी केली होती.  

बांगलादेश विरुद्धच्या कसोटी संघाची निवड ही दुलिप कंरडक स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीवर होणं अपेक्षित आहे. सध्याच्या घडीला या शर्यतीत मुशीर खान आघाडीवर असल्याचे दिसते. त्याचा मोठा भाऊ सरफराज खानही या शर्यतीत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्यानंत धावा काढूनही सरफराज खानला टीम इंडियातील एन्ट्रीसाठी खूप वाट पाहावी लागली होती. बीसीसीआय मुशीरसाठी असा उशीर धोरण बाजूला ठेवणार का? ते पाहावे लागेल. 

टॅग्स :सचिन तेंडुलकरभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ