Ranji Trophy Final 2024 - मुंबई संघाने रणजी करंडक स्पर्धेच्या फायनलमध्ये विदर्भ संघाविरुद्ध वर्चस्व गाजवले आहे. १९ वर्षीय मुशीर खान याने पुन्हा एकदा शतकी खेळी करून मुंबईला मोठी आघाडी मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. फॉर्माशी झगडणारा श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) आणि अजिंक्य रहाणे ( ७३) यांना शतकापासून वंचित रहावे लागले. फायनल पाहण्यासाठी वानखेडेवर महान फलंदाज सचिन तेंडुलकर व टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माही उपस्थित होते.
मुंबईच्या पहिल्या डावातील २२४ धावांच्या प्रत्युत्तरात विदर्भाचा पहिला डाव १०५ धावांवर गडगडला. धवल कुलकर्णी, शाम्स मुलानी व तनुष कोटियन यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावात पृथ्वी शॉ ( ११) व भुपेन लालवानी ( १८) ही सलामीची जोडी अपयशी ठरली. त्यानंतर कर्णधार अजिंक्यने युवा फलंदाज मुशीरला सोबत घेऊन १३० धावांची भागीदारी केली. अजिंक्य १४३ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ७३ धावांवर बाद झाला.