ढाका - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येबांगलादेशचा संघ हळूहळू प्रगती करत असतानाच बांगलादेशी क्रिकेटपटूंच्या आगावूपणाचे अनेक नमुने पाहायला मिळत आहेत. दरम्यान, असाच प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. देशांतर्गत टी-२० सामना सुरू असतानाचा बांगलादेशच्या एका अव्वल क्रिकेटपटूने आपल्या सहकारी खेळाडूवर हात उगारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
वंगबंधू टी-२० मालिकेमध्ये हा प्रकार घडला असून, बेक्सिमको ढाका संघाचा कर्णधार मुशफिकूर रहिम याने क्षेत्ररक्षणादरम्यान उडालेल्या गोंधळानंतर सहकारी खेळाडू नसूम अहमद याच्यावर हात उगारला. मात्र काही सेकंद घडलेल्या या प्रकारात मुशफिकूरने स्वत:ला सावरले. आणि वेळीच हात मागे घेतला. मात्र सामन्यानंतर या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
त्याचे झाले असे की, क्षेत्ररक्षण सुरू असताना यष्टीमागे उडालेला झेल पकडण्यासाठी यष्टीरक्षक मुशफिकूर रहीम सरसावला. यावेळी स्लिपमध्ये उभा असलेल्या नसूम अहमदचा त्याला धक्का लागला. त्यादरम्यान, मुशफिकूरने झेल पकडला. पण धक्का लागल्याने झेल सुटू शकला असता. त्यामुळे मुशफिकूरचा राग अनावर झाला आणि त्याने नसूमवर हात उगारण्याचा प्रयत्न केला. मात्र ही चूक मुशफिकूरच्या वेळीच लक्षात आली. त्यानंतर त्याने स्वत:ला सावरले. तसेच झाल्या प्रकाराबाबत नसूमला समजावण्याचाही प्रयत्न केला.
उत्तम यष्टीरक्षक आणि धडाकेबाज फलंदाज असलेला मुशफिकूर रहिम हा मैदानावरील करामतींसाठीही नेहमीच चर्चेत असतो. भारताला पराभूत केल्यानंतर त्याने मैदानावर केलेला नागीन डान्स प्रसिद्ध झाला होता. मात्र यावेळी सहकारी खेडाळूवरच हात उगारल्याने तो ट्रोल होत आहे.
Web Title: Mushfiqur Rahim, Bangladesh's star cricketer, raises his hand against his teammate on the field, video goes viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.