बांगलादेशचा सिनियर क्रिकेटपून मुशफिकूर रहीम सध्या ‘हँडल द बॉल’ प्रकारामुळे बाद झाल्याने चांगलाच चर्चेत आहे. आता या प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. मुशफिकूर रहिमवर हँडलिंग द बॉलमुळे स्पॉट फिक्सिंगचा आरोप झाला आहे. बांगलादेशमधीलच एका चॅनेलने त्याच्यावर हा आरोप केला आहे. त्यानंतर संतप्त झालेल्या मुशफिकूर रहिमने या टीव्ही चॅनेलला कायदेशीर नोटिस पाठवली आहे.
मीरपूरच्या मैदानावर बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यावेळी मुशफिकूर रहीम ‘हँडल द बॉल’ प्रकारामुळे बाद झाला होता. कायले जेमिन्सनने टाकलेल्या त्या षटकात मुशफिकूरने चेंडू खेळल्यानंतर उडालेला चेंडू हाताने दूर ढकलला होता. त्यानंतर किवी खेळाडूंनी केलेल्या अपीलनंतर त्याला बाद देण्यात आले होते. अशा प्रकारे बाद होणार मुशफिकूर रहीम हा पहिला बांगलादेशी क्रिकेटपटू ठरला होता. याआधी मोहिंदर अमरनाथ, मोहसिन खान, मायकल वॉन हे फलंदाजसुद्धा अशा प्रकारे बाद झाले होते.
या घटनेनंतर बांगलादेशमधील एक वृत्तवाहिनी एकटोर टीव्हीने मुशफिकूर रहीमचं अशाप्रकारे बाद होणं हे स्पॉट फिक्सिंगशी संबंधित असू शकतं, असा दावा केला. त्यानंतर चॅनलने हे वृत्त त्यांच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून हटवले. तसेच मुशफिकूर रहीमची माफी मागितली. मात्र आता मुशफिकूर रहीमने या वाहिनीला कायदेशीर नोटिस बजावली आहे.