Join us  

मुशफिकूर रहिमच्या द्विशतकाने 'हुकवला' हा विक्रम!

क्रिकेटमध्ये बरेच खेळाडू बरेच विक्रम करत असतात मात्र बांगलादेशचा यष्टीरक्षक मुशफिकूर रहिम याने याच्या उलट केलंय.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 8:00 PM

Open in App

ललित झांबरे

क्रिकेटमध्ये बरेच खेळाडू बरेच विक्रम करत असतात मात्र बांगलादेशचा यष्टीरक्षक मुशफिकूर रहिम याने याच्या उलट केलंय. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ५५ वर्षानंतर होऊ शकणारा विक्रम होऊ दिला नाही. सोमवारी ढाका येथे झिम्बाब्वेविरूद्धच्या कसोटीतील त्याच्या २१९ धावांच्या खेळीने ही अनोखी कामगिरी केली.

मुशफिकूरने हे द्विशतक केले नसते तर गेल्या ५५ वर्षातील कदाचित २०१८ हे असे पहिले वर्ष ठरले असते ज्यात कसोटी क्रिकेटमध्ये एकाही द्विशतकाची नोंद झाली नसती कारण यंदाची आतापर्यंतची सर्वोच्च कसोटी खेळी श्रीलंकेच्या कुसाल परेराच्या १९६ धावांची होती. 

यापूर्वी भेट १९६३ हेच असे शेवटचे वर्ष होते ज्यात एकसुद्धा कसोटी द्विशतक झळकले नव्हते. त्यावर्षीची सर्वोच्च खेळी ही सर कोनराड हंट यांची १८२ धावांची खेळी होती. इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर येथे त्यांनी ही खेळी केली होती. त्यानंतर १९६४ पासून आतापर्यंत दरवर्षी कसोटी क्रिकेटमध्ये किमान एकतरी द्विशतक झळकले आहे. 

मुशफिकूरने ५५ वर्षांपासूनचा एक विक्रम हुकवला असला तरी दुसरा मात्र केला आहे. कसोटी सामन्यांमध्ये एकापेक्षा अधिक द्विशतक करणारा तो पहिलाच यष्टीरक्षक ठरला आहे. मुशफिकूरच्या आधी कसोटी क्रिकेटमध्ये सात यष्टीरक्षकांनी द्विशतकं झळकावली आहेत. मात्र कोणत्याही यष्टीरक्षकाच्या नावावर दोन किंवा अधिक कसोटी द्विशतकं लागलेली नव्हती.

टॅग्स :बांगलादेश