मुंबईमुंबईचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर आणि कृतिक हणगवडी या दोन युवा खेळाडूंची सय्यद मुश्ताक अली टी-२० करंडक स्पर्धेसाठी मुंबईच्या संघात निवड झाली आहे.
कोविड-१९ मुळे या स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल करावे लागले. आता ही स्पर्धा १० जानेवारीपासून सुरू होणार असल्याचं निश्चित झालं आहे. मुंबईच्या संघाचा या स्पर्धेत 'ग्रूप इ'मध्ये समावेश करण्यात आला आहे. या ग्रूपमध्ये दिल्ली, हरयाणा, केरळ, आंध्र प्रदेश आणि पदुच्चेरी हे संघ असणार आहेत. येत्या ११, १३, १५, १७ आणि १९ जानेवारी रोजी मुंबईच्या संघाचे साखळी सामने होतील. त्यानंतर अहमदाबाद येथे बाद फेरी होणार आहे.
"तीन दिवसांपूर्वी बीसीसीआयने सर्व संघांना एकूण २२ खेळाडूंची निवड करण्याची परवानगी दिली. हे सर्व खेळाडू कोविड-१९ च्या नियमांनुसार बायो-बबलमध्ये राहतील. याशिवाय, नेट्समध्ये गोलंदाजी करणारे आणि बदली खेळाडू देखील बाहेरुन मागवता येणार नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर अर्जुन आणि कृतिक यांची मुंबईच्या संघात निवड झाली आहे. हे दोघंही मुंबईच्या संघाचे अनुक्रमे २२ आणि २३ वे खेळाडू आहेत", अशी माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सुत्रांनी दिली आहे.
अर्जुन तेंडुलकर याआधी १९ वर्षाखालील भारतीय संघाकडून खेळला आहे. याशिवाय, मुंबईच्या संघाचंही प्रतिनिधित्व त्यानं केलं आहे. अर्जुन आणि कृतिक यांच्यासोबतच तुषार देशपांडे, धवल कुलकर्णी, मिनाद मांजरेकर आणि प्रथमेश डाके यांचीही निवड करण्यात आली आहे.