Join us  

मुश्ग्ताक अली टी२० : मुंबईचा रोमांचक विजय गुजरातचा ५ बळीने पराभव

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात मुंबईने मोक्याच्यावेळी खेळ उंचावताना यजमान गुजरात संघाचा ५ बळीने पराभव करत पश्चिम विभाग सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेत विजयी आगेकूच केली. गुजरातने दिलेल्या १६८ धावांच्य्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने ४ चेंडू शिल्लक ठेवत ५ बाद १६८ धावा काढल्या.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 3:14 AM

Open in App

मुंबई : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात मुंबईने मोक्याच्यावेळी खेळ उंचावताना यजमान गुजरात संघाचा ५ बळीने पराभव करत पश्चिम विभाग सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेत विजयी आगेकूच केली. गुजरातने दिलेल्या १६८ धावांच्य्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने ४ चेंडू शिल्लक ठेवत ५ बाद १६८ धावा काढल्या.सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबई कर्णधार आदित्य तरे याने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. अनुभवी धवल कुलकर्णी (३/३२) याच्या नियंत्रित गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने गुजरातला २० षटकात ७ बाद १६७ असे रोखले. यानंतर धावांचा पाठलाग करताना मुंबईकरांचीही दमछाक झाली. जय बिस्ताने सूत्रे आपल्याकडे घेत आक्रमक फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. ब्रेविश संयमी फलंदाजी करत त्याला चांगली साथ देत होता. या दोघांनी ८.१ षटकात मुंबईला ५९ धावांची सलामी दिली. फिरकीपटू पियूष चावलाने ९व्या षटकात ब्रेविश (१६) आणि तरे (०) यांना बाद करुन मुंबईला बॅकफूटवर आणले. यानंतर स्थिरावलेल्या बिस्ताला जेके परमार याने बाद केले. बिस्ताने ३५ चेंडूत ७ चौकार व एका षटकारासह ५० धावांची खेळी केली.यावेळी गुजरात वर्चस्व गाजवणार असे दिसत होते. परंतु, सिध्देश लाड (२०) आणि सूर्यकुमार यादव (४५*) यांनी ४५ धावांची वेगवान भागीदारी केली. लाड आणि शशांक सिंग (७) परतल्यानंतर सूर्यकुमार आणि शिवम दुबे (२३*) यांनी अखेरपर्यंत नाबाद राहत मुंबईला विजयी केली.तत्पूर्वी, यष्टीरक्षक सलामी फलंदाज ध्रुव रावल याने ३४ चेंडूत ९ चौकार व ४ षटकारांसह ७३ धावांची दमदार खेळी करत गुजरातला समाधानकारक धावसंख्या उभारुन देण्यात मोलाची कामगिरी केली. कर्णधार अक्षर पटेल यानेही ३५ चेंडूत १ चौकार व एका षटकारासह ३५ धावा फटकावल्या. अनुभवी धवलने ३ महत्त्वपूर्ण बळी घेत गुजरातच्या धावसंख्येला ब्रेक मारला. तुषार देशपांडे, परिक्षित वलसंगकर आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्यकी एक बळी घेत धवलला चांगली साथ दिली. या विजयासह मुंबईचे ४ गुणांची कमाई केली आहे.धावफलकगुजरात : प्रियांक पांचाळ झे. तरे गो. धवल ८, ध्रुव रावल झे. पारकर गो. तुषार ७३, रुजुल भट झे. तुषार गो. धवल १, क्षितीज पटेल धावबाद (धवल) १६, अक्षर पटेल झे. तुषार गो. शार्दुल ३५, चिराग गांधी झे. तरे गो. वलसंगकर ११, रोहित दहिया झे. तरे गो. धवल १५, पियूष चावला नाबाद १, संतोष शिंदे नाबाद ०. अवांतर - ७. एकूण : २० षटकात ७ बाद १६७ धावा.गोलंदाजी : धवल कुलकर्णी ४-०-३२-३; तुषार देशपांडे ४-०-३६-१; परिक्षित वलसंकगर ४-०-२१-१; शार्दुल ठाकूर ४-०-३१-१; सिध्देश लाड १-०-१४-०; जय बिस्ता १-०-१३-०; शिवम दुबे २-०-१५-०.मुंबई : जय बिस्ता झे. शिंदे गो. परमार ५०, ब्रेविश शेट्टी झे. गांधी गो. चावला १६, आदित्य तरे त्रि. गो. चावला ०, सिध्देश लाड झे. पटेल गो. शिंदे २०, सूर्यकुमार यादव नाबाद ४५, शशांक सिंग झे. रावल गो. पटेल ७, शिवम दुबे नाबाद २३. अवांतर - ७. एकूण : १९.२ षटकात ५ बाद १६८ धावा. गोलंदाजी : अक्षर पटेल ४-०-३३-१; इश्वर चौधरी २-०-१७-०; जयवीर परमार ४-०-३०-१; रोहित दहिया २-०-३१-०; पियूष चावला ४-०-२९-२; संतोष शिंदे ३.२-०-२५-१.

टॅग्स :क्रिकेट