Join us  

मुश्ताक अली T20 स्पर्धा: विदर्भ क्रिकेट संघाच्या उपकर्णधारपदी अकोल्याचा अथर्व तायडे

अथर्वसोबत अकोला क्रिकेट क्लबच्या दर्शन नळकांडेचीही निवड

By रवी दामोदर | Published: October 01, 2022 5:19 PM

Open in App

अकोला: बीसीसीआय अंतर्गत येत असलेल्या सैय्यद मुश्तक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी नुकतीच विदर्भ क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. विदर्भ क्रिकेट संघाच्या उपकर्णधारपदी अकोल्याचा क्रिकेटपटू अर्थव तायडेची वर्णी लागली आहे. विदर्भ क्रिकेट स्पर्धेमध्ये अकोला क्रिकेट क्लबच्या अर्थव तायडे व दर्शन नळकांडे या दोन खेळाडूंना विदर्भ क्रिकेट संघामध्ये स्थान मिळाले आहे. सैय्यद मुश्तक अली टी-२० स्पर्धा ही राजकोट येथे दि. ११  ते २२ ऑक्टोबर २०२२ पर्यंत होणार आहे.

स्पर्धेत विदर्भ संघ ग्रुप ‘ए’मध्ये असून, त्याचा सामना ग्रुपमधील राजस्थान, मध्य प्रदेश, मुंबई, आसाम, रेल्वे, उत्तराखंड, मिझोराम या संघासोबत होणार आहे. गेल्या ८-९ वर्षात क्लबच्या खेळाडूंनी खेळात सातत्य ठेवून अकोला क्रिकेट क्लब, जिल्हा तथा विदर्भाचे नांव राष्ट्रीय/आंतराष्ट्रीय स्तरावर नेले असून, हि बाब अकोला क्रिकेट क्लब व जिल्ह्यासाठी प्रेरणादायी आहे. अकोला क्रिकेट क्लबच्या दोन खेळाडूंची निवड झाल्याने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

क्रिकेट क्लबच्या दोन खेळाडूंची मुश्ताक अली टी-२० स्पर्धेसाठी निवड होणे जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. दोन्ही खेळाडू उरात मोठे स्वप्न घेऊन आत्मविश्वासाने मैदानात उतरतील, असे भरत डिक्कर (कर्णधार, अकोला क्रिकेट क्लब तथा जिल्हा संयोजक विदर्भ क्रिकेट संघटना) म्हणाले.

टॅग्स :अकोला
Open in App