ICC World Cup : २०११चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर २३ वर्षीय विराट कोहलीनं खांद्यावर उचलून घेतलेला महान फलंदाज सचिन तेंडुलकर आजही लक्षात आहे. तेव्हा विराट म्हणाला होता की, सचिनने २४ वर्ष भारतीय संघाचे ओझे त्याच्या खांद्यावर वाहिले, आता त्याला खांद्यावर उचलून घेण्याची वेळ आहे.'' २०२३च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर विराट कोहलीने जुन्या आठवणींना उजाळा दिला अन् ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२३मध्ये भारतात होणाऱ्या स्पर्धेसाठी सज्ज असल्याचा निर्धार बोलून दाखवला.
''२०११चा वर्ल्ड कप जिंकणे, हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा क्षण आहे. तेव्हा मी फक्त २३ वर्षांचा होतो आणि त्यावेळी मला त्या विजयाची तीव्रता कदाचित समजली नव्हती. पण, आता मी ३४ वर्षांचा आहे आणि अनेक वर्ल्ड कप स्पर्धा खेळलो आहे. पण, त्यापैकी एकही जिंकता आलेली नाही. त्यामुळे २०११ मध्ये सीनियर्स खेळाडूंच्या ज्या भावना होत्या, त्या मला आता समजत आहेत. सचिन तेंडुलकरचा तो शेवटचा वर्ल्ड कप होता आणि त्याने त्यापूर्वी अनेक वर्ल्ड कप स्पर्धा खेळल्या होत्या. त्यामुळे वर्ल्ड कप तोही मुंबईत आणि घरच्या मैदानावर जिंकणे, हा क्षण त्याच्यासाठी खूप खास होता. हे त्याचे स्वप्न होते,''असे कोहलीने PTI च्या एका कार्यक्रमात मत व्यक्त केले.
विराटने २०११च्या वर्ल्ड कप स्पर्धेत ९ सामन्यांत २८२ धावा केल्या. वानखेडे स्टेडियमवर फायनलमध्ये त्याने ३५ धावा केल्या होत्या. त्यावेळी सीनियर खेळाडूंनी हाताळलेल्या दबावाबाबतही कोहली म्हणाला,''जेव्हा आम्ही प्रवास करायचो, तेव्हा सर्व खेळाडूंवर असलेला दबाव जाणवायचा आणि आजही मला ते लक्षात आहे. नशीब तेव्हा सोशल मीडिया नव्हतं. ते असतं तर ती काळरात्र ठरली असती, खरंच सांगतोय. पण, तेव्हा प्रत्येकाच्या डोक्याच एकच गोष्ट होती आणि ती म्हणजे आम्हाला वर्ल्ड कप जिंकायचा आहे. सीनियर खेळाडू नेहमी दडपणात असायचे आणि त्यांनी ते योग्यरितीने हाताळले. वर्ल्ड कप विजयाची ती रात्र मॅजिकल होती.''