नवी दिल्ली : भारताने २०२०-२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वामध्ये ऐतिहासिक मालिका विजय मिळवला होता. मात्र रहाणेने ‘ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिका विजयातील माझे श्रेय दुसराच व्यक्ती घेऊन गेला,’ असे म्हटले. मूळचा डोंबिवलीकर असलेला रहाणे सध्या खराब फॉर्ममुळे टीकाकारांच्या रडावर आहे. त्याच्याकडील उपकर्णधारपदही काढून घेण्यात आले होते. मात्र एका कार्यक्रमात त्याने आपली निराशा व्यक्त केल्याने सर्वांनाच धक्का बसला.ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात भारताचा ३६ धावांत खुर्दा उडाला. या लाजिरवाण्या पराभवानंतर कोहली पितृत्त्व रजा घेऊन मायदेशी परतला आणि भारताची धुरा तत्कालीन उपकर्णधार रहाणेने सांभाळली. रहाणेने संघात जोश भरला आणि दुसऱ्या सामन्यात शानदार शतकाच्या जोरावर भारताला मेलबर्न येथे विजयी केले. यानंतर भारताने मालिकाही २-१ अशी जिंकली. रहाणेने बॅकस्टेज विथ बोरिया कार्यक्रमात म्हटले की, ‘मला माहीत आहे, मी तिथे काय मिळवलंय. मला काहीही सिद्ध करुन दाखवायची गरज नाही. श्रेय मिळवण्यासाठी पुढे येणाऱ्यांपैकी मी नाही. काही असे निर्णय होते जे मी मैदान किंवा ड्रेसिंग रुममध्ये घेतले होते. पण याचे श्रेय दुसरीच व्यक्ती घेऊन गेली. मालिका विजयानंतर अनेकांनी प्रतिक्रिया देताना माझे निर्णय त्यांनीच घेतल्याप्रमाणे सांगितले होते. मला माहीत होते, ते निर्णय मी घेतले होते.’
रवी शास्त्री यांच्यावर निशाणा?अजिंक्यने आपली निराशा व्यक्त करता कोणाचाही उल्लेख केला नाही. मात्र, त्याचा इशारा तत्कालीन प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर होता असे म्हटले जात आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्यावेळी अनेक भारतीय खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते. त्यानंतरही मिळवलेल्या मालिका विजयाने प्रशिक्षक शास्त्री यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता.
'कर्णधार' रहाणेचे कसोटी यश०६ - सामने ०४ - विजय०२ - अनिर्णित कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणे अपराजित आहे. त्याने आतापर्यंत नेतृत्त्व केलेल्या कसोटी सामन्यांत भारताचा पराभव झालेला नाही.