ऑकलंड : न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू क्रिस क्रेर्न्स पुन्हा चालू शकणार की नाही, याबद्दल स्वत: साशंक आहे. जीवघेण्या शस्त्रक्रियेनंतरही मी बचावलो हे माझे भाग्य मानतो, असे मनोगत त्याने व्यक्त केले आहे. क्रेर्न्सच्या कंबरेखालचा भाग पोलिओग्रस्त झाला आहे. तीन महिन्यांआधी त्याच्यावर हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली. पाठोपाठ त्याला अनेक शस्त्रक्रियांना सामोरे जावे लागले.
त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास प्रणालीवर ठेवण्यात आले. यादरम्यान स्पायनल स्ट्रोक झाल्यामुळे कंबरेखालचा भाग पांगळा झाला आहे. ५१ वर्षांचा क्रेर्न्स यातून सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. शस्त्रक्रियेच्या चार महिन्यांनंतर तो कॅनबेरा विद्यापीठाच्या इस्पितळात पुनर्वसन सुविधेचा लाभ घेत आहे. न्यूझीलंडमधील एका वेबसाइटशी बोलताना हा माजी दिग्गज म्हणाला, ‘पुन्हा चालू-फिरू शकणार की नाही, हे मला माहीत नाही. मी जसा आहे त्या स्थितीत परिस्थितीचा सामना करण्याचे ठरविले आहे. व्हीलचेअरच्या मदतीने संपूर्ण आनंददायी आयुष्य जगू शकतो काय, हे समजून घेत आहे. परिस्थितीशी ताळमेळ साधण्यास थोडा वेळ लागेल.’
कारकीर्दीत सर्वाेत्कृष्ट अष्टपैलू म्हणून परिचित झालेला क्रेर्न्स याने न्यूझीलंडकडून ६२ कसोटी २१५ वन डे आणि दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले.
- ‘माझ्या आजाराला १४ आठवडे पूर्ण झाले. मागे वळून पाहताना संपूर्ण आयुष्यभर असेच जगतो की काय, असे वाटते. ‘चार वेळा ओपन हार्ट सर्जरी झाली’ त्या आठ- नऊ दिवसांतील काहीही मला आठवत नाही.’