कोरोना व्हायरसच्या संकटात जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द आहेत. त्यामुळे खेळाडू आपापल्या कुटुंबीयांना पुरेसा वेळ देत आहेत. कोरोना व्हायरसच्या संकटात इंडियन प्रीमिअर लीगवरही अनिश्चिततेचं सावट आहे. अशात काही खेळाडू आयपीएल कसं खेळवता येईल, यासाठी अनेक पर्याय सूचवत आहेत. पण, भारताचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाचं मत काही वेगळं आहे. खेळापेक्षा माझ्यासाठी कुटुंब अधिक महत्त्वाचे असल्याचे मत, रैनानं 'हिंदुस्थान टाईम्स' या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना व्यक्त केलं.
तो म्हणाला,''प्रत्येकानं या परस्थितीत विचारपुर्वक वागले पाहीजे आणि अशा कोणत्याही ठिकाणी जाता कामा नये जिथे कोरोना व्हायरसचे संकट ओढावले जाऊ शकते. अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा. ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. तुम्ही जितका अधिक काळ घरी थांबाल, तितके सुरक्षित राहाल.''
''मागील महिन्यात मी दिल्लीच्या घरात परतलो. घरी राहुन मी मुलीची आणि पत्नी व छोट्या बाळाची काळजी घेत आहे. माझ्या गाडीसह, घरालाही सॅनिटाईझ केले आहे. चेन्नई सुपर किंग्सनं शिबीर थांबवल्यानंतर आम्ही सर्व आपापल्या घरी परतलो. कोरोना व्हायरसचं संकट जगावर संकट आलं आहे. आयपीएल झाली तर चांगलंच आहे, परंतु तुम्ही माणूस आहात, तुम्हाला कुटुंब, मित्रपरिवार आहे. माझ्यासाठी खेळापेक्षा कुटुंब अधिक महत्त्वाचं आहे आणि हे प्रत्येकासाठी असेल,'' असंही रैनाने सांगितले.
सराव सत्र रद्द झाल्यानंतर रैनानं तातडीनं घरी परतण्याचा निर्णय घेतला. रैनाची मुलगी ग्रेसिया चार वर्षांची आहे. आता कोणतं संकट आलंय, याची तिला कल्पना नाही. त्यामुळे रैना तिला शिकवण्यात वेळ घालवत आहे.