कोलकाता : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीवर गंभीर आरोप करणारी त्याची पत्नी हसीन जहाँने आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. या बैठकीमध्ये, माझी लढाई ही सत्याची आहे. माझ्यासारख्या सर्व सामान्य महिलेला तुम्हीच न्याय मिळवून देऊ शकता, अशी विनवणी हसीनने ममता दीदींना केली आहे.
हसीनने सोमवारी मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन ममता दीदींना भेटायची विनंती केली होती. त्यानुसार हसीनला शुक्रवारी ममता दीदींना भेटण्यासाठी बोलावण्यात आले होते.
ममता दीदींची भेट घेतल्यानंतर हसीन म्हणाली की, " मी शुक्रवारी ममता दीदींची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की, माझ्यासारख्या महिलेला तुम्ही न्याय मिळवून द्यायला हवा. माझी लढाई ही सत्याची आहे. माझ्या नवऱ्याने बरेच गुन्हे केले आहेत. बऱ्याच जणांची फसवणूकही केली आहे. शामीने मला भरपूर त्रास दिला आहे. "
काय आहे प्रकरणहसीन जहाँने आपला पती शामीचे बऱ्याच स्त्रियांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर पाकिस्तानमध्येही त्याची एक प्रेयसी आहे. तिच्याबरोबर त्याने दुबईमध्ये काही काळ व्यतित केला आहे, असा आरोपही हसीनने केला होता. त्यानंतर हसीनने शामीवर मॅच फिक्सींग आणि देशाची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. या आरोपांनंतर कोलकाता पोलिसांनी शामीची चौकशी केली होती.