कोलकाता : ‘लोक नेहमीच बोलत राहणार. हे त्यांचे कामच आहे. यावर मी काहीच करू शकत नाही. हार्दिक पांड्या नाव नेहमीच विकले जाते आणि यावर मला काहीच अडचण नाही. मी नेहमीच माझ्यासमोरील आव्हानांचा आनंदाने सामना केला आहे,’ असे मत गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याने व्यक्त केले.
हार्दिकची कारकीर्द अनेकदा वादग्रस्त ठरली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक चढ-उतार आणि दुखापतींचा सामना केला. मात्र, दरवेळी त्याने समर्थपणे समोर आलेल्या अडचणींचा सामना केला. यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरातचे शानदार नेतृत्व करताना त्याने संघाला अंतिम फेरीत नेले. शिवाय स्वत: अष्टपैलू खेळाद्वारे प्रभावित केले. दुबई येथे ८ नोव्हेंबरला झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत नामिबियाविरुद्धच्या सामन्यात तो भारताकडून अखेरचा सामना खेळला होता. त्यानंतर कंबरेच्या दुखापतीमुळे त्याला गोलंदाजी करताना अडचणी आल्या. मुंबई इंडियन्सने रिलिज केल्यानंतर गुजरातने हार्दिकला १५ कोटी रुपयांची किंमत देऊन निवडले. त्याच्याकडे संघाची धुरा सोपविल्यानंतर अनेकांनी टीका केला. मात्र, हार्दिकने आपला आदर्श महेंद्रसिंग धोनीप्रमाणेच आपल्या कामगिरीतून सर्वांना उत्तर दिले. याविषयी हार्दिक म्हणाला की, ‘माझ्या आयुष्यात माहीभाईची भूमिका मोठी आहे. तो माझ्यासाठी भाऊ, मित्र व कुटुंबाप्रमाणे आहे. त्याच्याकडून मी खूप शिकलो. मानसिकरीत्या कणखर राहूनच मी विविध आव्हानांचा सामना केला आहे.’हार्दिक पुढे म्हणाला की, ‘कर्णधारपद सांभाळण्याच्या आधीही मी शांत राहत असे. आपल्या कारकिर्दीत आणि जीवनातही घाई करण्याऐवजी दहा सेकंद थांबून नीट विचार वाटचाल करणे पसंत करतो.’
घरच्या मैदानावर अंतिम सामना खेळण्याचा अनुभव शानदार ठरेल. इतके मोठे स्टेडियम, आमचे घरचे मैदान आणि आमचे राज्य, यासाठी उत्सुक आहे. आशा आहे की, स्टेडियम प्रेक्षकांनी पूर्ण भरले जाईल.- हार्दिक पांड्या