मुंबई - भारतीय क्रिकेटच्या तिन्ही संघाचा कर्णधार विराट कोहलीला संधी दिल्यामुळे माझी निवड समिती प्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आली होती, असा गौप्यस्फोट दिलीप वेंगसरकर यांनी केला आहे. पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या 'डेमोक्रसी इलेव्हन' पुस्तकात त्यांनी हा खुलासा केला आहे. या पुस्तकात भारतीय क्रिकेटमधील महान खेळाडू एमके पतौडी, सुनील गावस्कर, कपिल देव यांचादेखील समावेश आहे. तामिळनाडूचा खेळाडू एस बद्रीनाथच्या जागी विराट कोहलीची निवड केल्यामुळे माजी बीसीसीआय अध्यक्ष एन श्रीनिवासन यांच्या सोबत झालेल्या वादावरही वेंगसरकर यांनी या पुस्तकात वक्तव्य केलं आहे.
सध्या विराट कोहली कर्णधार आणि एक खेळाडू म्हणून सर्वोत्कृष्ट असला तरी त्याची पहिल्यांदा निवड झाली त्यावेळी मला माझं पद गमावावं लागल्याचे वेंगसकरांनी सांगितले. 2008 मध्ये 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा जिंकल्यानंतर विराट कोहली प्रकाशझोतात आला होता. यानंतर त्याला एस बद्रीनाथऐवजी राष्ट्रीय संघात संधी दिली गेली. वेंगसरकर यांचा हा निर्णय श्रीनिवासन यांना आवडला नाही. त्यावेळी ते बीसीसीआयचे कोषाध्यक्ष आणि तामिळनाडू क्रिकेट संघाचे अध्यक्ष होते. वेंगसरकर यांनी विराटसाठी बद्रीनाथला ड्रॉप केल्याचं श्रीनिवास यांना समजल्यावर ते रागावून तत्कालीन बीसीसीआय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे तक्रारीसाठी गेले असल्याचं वेंगसरकर यांनी पुस्तकात म्हटलं आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मला निवड समितीच्या पदावरून काढून टाकण्यात आलं. मात्र विराट कोहलीची निवड करण्याचा माझा निर्णय ते बदलू शकले नाहीत, असंही वेंगसरकर म्हणाले.