वेलिंग्टन : क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत आणखी तीन वर्षे कठोर मेहनत करण्याची आपली तयारी असून, त्यानंतर स्वत:च्या कामाचा व्याप थोडा कमी करू शकतो, असे संकेत भारतीय कर्णधार विराट कोहली याने दिले आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये सर्वोत्कृट फलंदाजात गणना होत असलेल्या कोहलीने पुढील तीन वर्षांत टी-२० चे दोन आणि एकदिवसीय क्रिकेटचा एक विश्वचषक जिंकण्याचा भारतीय क्रिकेटचा प्रयत्न असेल. त्यानंतरच या तिन्ही प्रकारांपैकी कुण्या दोन प्रकारात खेळण्याचा निर्णय होईल, असे स्पष्ट केले.
भारतात २०२१ ला होणाºया टी-२० विश्वचषकानंतर किमान एका प्रकाराला अलविदा करण्याचा विचार सुरू आहे काय, असे विचारताच कोहली म्हणाला, ‘माझा विचार स्पष्ट आहे. आतापासून पुढील तीन वर्षे मी कठोर मेहनत घेण्याची तयारी करीत आहे.’ न्यूझीलंडविरुद्ध शुक्रवारी सुरू होत असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेआधी कोहलीने बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. थकवा आणि कामाचे ओझे या मुद्यांवर नेहमी चर्चा व्हायला हवी, असेही कोहली म्हणाला. मागील आठ वर्षांपासून किमान ३०० दिवस मी सातत्याने खेळत आहे. त्यात सराव आणि प्रवासदेखील येतो. त्यामुळेच मधल्या काळात सुट्या घेत कुटुंबासमवेत वेळ घालवणे माझ्यासाठी लाभदायी ठरल्याचे मत ३१वर्षांच्या विराटने व्यक्त केले.प्रत्येक खेळाडू सतत खेळाबाबत विचार करीत असतो. सामन्यांच्या वेळापत्रकादरम्यान अनेकदा सुट्या घेता येत नाहीत, तरीही व्यस्त वेळापत्रकात आम्ही सुट्या घेतो. प्रत्येक प्रकारात खेळणाºया खेळाडूंना सुट्या घेणे फार गरजेचे असते. कर्णधार या नात्याने मला डावपेच आखण्यासाठी डोके थंड ठेवावेच लागते. शरीरासोबत मस्तिष्कालादेखील विश्रांतीची गरज असते, याकडे विराटने लक्ष वेधले. (वृत्तसंस्था)आयसीसीची कसोटी चॅम्पियनशिपसर्वांत मोठी स्पर्धाआयसीसीच्या अनेक स्पर्धांपैकी कसोटी चॅम्पियनशिप ही सर्वांत मोठी स्पर्धा असल्याचे मत कोहली याने व्यक्त केले. २०२३ ते २०३१ या आठ वर्षांत अधिकाधिक वन डे आणि टी-२० सामने खेळविण्याची आयसीसीची योजना आहे. या पार्श्वभूमीवर विराट म्हणाला, ‘माझ्यासाठी अन्य सर्व स्पर्धा नंतर आहेत. आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपचा दर्जा अव्वल असायला हवा. प्रत्येक संघ लॉर्डस्वर कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यास इच्छुक असेल. आम्हीही त्याला अपवाद नाही. आमचे लक्ष्य पात्रता गाठण्यापेक्षा कसोटी चॅम्पियनशिप जिंकण्याकडे असेल. कसोटीत गुण दिले जात असल्याने पारंपरिक पद्धतीत आता अधिक उत्कंठा आली आहे. प्रत्येक संघ सामना अनिर्णीत राखण्याऐवजी विजयावर लक्ष केंद्रित करीत आहे. विदेशात आम्हीदेखील कसोटी विजयासाठीच खेळू.’