इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL) चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) गेल्या वर्षभरात फिनिक्स भरारी घेत IPL 2021चे जेतेपद नावावर केलं. मागच्या वर्षी जेव्हा महेंद्रसिंग धोनीला ( MS Dhoni) CSKकडून अखेरचा सामना का असे विचारले गेले, तेव्हा त्यानं Definitely Not हे आत्मविश्वासानं उत्तर दिलं. तोच प्रश्न याहीवेळेस अंतिम सामन्यानंतर विचारला गेला, परंतु धोनीकडून थेट उत्तर मिळालं नाही. त्यामुळे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या, परंतु CSKनं धोनीला IPL 2022साठी रिटेन करणार असल्याचं जाहीर केलं आणि या चर्चा थांबल्या. पण, आता चेन्नई सुपर कंग्सचे मालक एन श्रीनिवासन ( N Srinivasan) यांच्या उत्तरानं चाहते बुचकळ्यात पडले आहेत.
पुढील आयपीएलमध्ये धोनी खेळणार की नाही, या प्रश्नावर श्रीनिवासन यांनी सरळ उत्तर दिले नाही, परंतु ते म्हणाले,''धोनीनं पुढील वर्षी खेळावं अशी माझी इच्छा आहे. धोनी खूप चांगला माणूस आहे आणि CSKनं त्याच्यासाठी बराच पैसा वाया घालवू नये अशी त्याची इच्छा आहे. धोनी प्रक्रियेला फॉलो करतो आणि त्याचे निकाल आपोआप मिळतात. धोनीमुळेच चेन्नई सुपर किंग्सची मार्केट वॅल्यू आहे. CSKच्या कामात माझा काहीच हस्तक्षेप नसतो. मग संघ सलग २-३ सामने हरला, तरी मी काहीच बोलत नाही. मी स्वतः एक खेळाडू होतो आणि खेळात जय-पराजय सुरुच असते. माझ्यासाठी CSK एक कुटूंब आहे आणि त्यांच्याकडे मी फ्रँचायझी म्हणून पाहत नाही.''
धोनीनं पुढील वर्षीही खेळावं ही श्रीनिवासन यांची इच्छा आहे. ते म्हणाले,''महेंद्रसिंग धोनीनं CSKकडून आणखी खेळावं, ही माझी इच्छा आहे. धोनी माझा आदर करतो आणि मी त्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. तो क्रिकेटपटू आणि मी उद्योजक असल्यानं आमची फार भेट होत नाही. २०११च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्यावेळी मला कोच गॅरी कर्स्टन म्हणाले होते, की चिंता करू नका मैदानात धोनीचा हात कुणीच पकडू शकत नाही. संपूर्ण देशात त्याचे फॉलोअर्स आहेत आणि तामिळनाडूतील लोकं त्याच्यावर प्रेम करतात.''