चेन्नई: भारतीय संघाचा मेंटॉर आणि IPL मधील चेन्नई सुपर किंग संघाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) याच्या पुढील वर्षी खेळवल्या जाणाऱ्या आयपीएल स्पर्धेतील सहभागाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, धोनी पुढची आयपीएल खेळणार की नाही, याबाबत क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. यातच आता चेन्नई सुपर किंग (CSK) फ्रेंचायझीचे माजी मालक आणि इंडिया सीमेंट कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एन. श्रीनिवासन यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. महेंद्र सिंह धोनीशिवाय चेन्नई सुपर किंग संघाची कल्पनाही करवत नाही, असे श्रीनिवासन यांनी म्हटले आहे.
श्रीनिवासन भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) चे माजी अध्यक्षही होते. महेंद्र सिंह धोनी आणि चेन्नई सुपर किंग संघ एकमेकांना एवढे पूरक आहेत की, या दोघांची एकमेकांशिवाय कल्पनाही केली जाऊ शकत नाही, असे श्रीनिवासन यांनी म्हटले आहे. चेन्नई सुपर किंग संघाने यंदाच्या IPL स्पर्धेवर विजेतेपदाची मोहोर उमटवल्यानंतर श्रीनिवासन यांनी ट्रॉफीसह भगवान वेंकटाचलापाती मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर श्रीनिवासन यांनी माध्यमांशी संवाद साधला.
चेन्नईचा संघ, धोनी हे तामिळनाडूचे अविभाज्य भाग
महेंद्र सिंह धोनी, सीएसके संघ, चेन्नई आणि तामिळनाडूचे अविभाज्य भाग आहेत. धोनीशिवाय सीएसके आणि सीएसकेशिवाय धोनी होऊच शकत नाहीत. अशी कल्पनाही करणे कठीण आहे, असे श्रीनिवासन यांनी नमूद केले. दरम्यान, इंडियन प्रीमिअर लीगचे चौथे जेतेपद चेन्नई सुपरकिंगने पटकावले. चेन्नई सुपर किंग्सकडून मी खेळणार की नाही, हे महत्त्वाचे नाही. CSK साठी काय सर्वोत्तम आहे, ते महत्त्वाचे आहे. कोअर ग्रुपने १० वर्ष या टीमला सांभाळले आणि आता पुढे संघहिताचे काय आहे, ते पाहायला हवे, असे सूचक विधान एमएस धोनीने केले होते.
दरम्यान, सन २०१४ पर्यंत इंडिया सीमेंटकडे चेन्नई सुपर किंग संघाचे स्वामित्व होते. मात्र, त्यानंतर चेन्नई सुपर किंग क्रिकेट लिमिटेडकडे याचे हस्तांतरण करण्यात आले.