- विशाल हळदे
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील आंतरशालेय विद्यार्थांसाठी गेली 47 वर्षे खेळवली जाणारी स्टार स्पोर्टस् क्लब आयोजित आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन संलग्न एन. टी. केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडा संकुल येथे सुरू आहे.
या स्पर्धेत सोमवारी झालेल्या श्री माँ विद्यालय, ठाणे व ऑल सेंटस् हायस्कूल, भिवंडी यांच्यातील सामना श्री माँ विद्यालयाने तब्बल 78 धावांच्या फरकाने जिंकला. श्री माँ विद्यालय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली आणि 26 षटकांमध्ये सर्व गडी बाद 158 धावा केल्या. सुरुवातीच्या फलंदाजांनी नांगी टाकली तरीही कर्णधार अभिनंदन चव्हाण याने चिकाटीने 45 धावांची खेळी केली, तर तळाचे फलंदाज अद्विक मंडलिक 29 आणि अथर्व सुर्वे याने 22 धावा केल्या.
दोघांमध्ये झालेल्या भागीदारीवर श्री माँ ने 158 धावसंख्या गाठली. त्यानंतर खेळण्यास उतरलेल्या ऑल सेंट्स विद्यालय, भिवंडी हा संघ अवघ्या 80 धावांत गडगडला. श्री माँ विद्यालय संघाच्या रुद्र चाटभर याने 4 गडी बाद केले तर त्याला अद्वैत कौलगी व अद्विक मंडलिक यांनी प्रत्येकी अनुक्रमे 3 व 2 गडी बाद करून मोलाची साथ दिली.