इंडियन प्रीमियर लीग ( IPL) २०२४ सुरू होण्यापूर्वी हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. रोहित शर्माच्या जागी कर्णधार म्हणून तो मुंबई इंडियन्सचे ( Mumbai Indians) नेतृत्व करणार आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील लढतीत त्याच्या घोट्याला दुखापत झाली होती आणि तेव्हापासून पांड्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेत, दक्षिण आफ्रिका दौऱ्यालाही तो मुकला होता. मागील नोव्हेंबरमध्ये पांड्याला गुजरात टायटन्स (GT) कडून मुंबई इंडियन्स (MI) मध्ये आपल्या ताफ्यात घेतले. ट्रेडिंग विंडोतून हा सौदा झाला आणि त्यानंतर पाचवेळा आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सने त्याला कर्णधार केले. आयपीएलपूर्वी हार्दिकने मनमोकळ्या गप्पा मारल्या.
"माझ्या चाहत्यांना माझ्याबद्दल एक गोष्ट माहित नाही, ती म्हणजे मी बाहेर जात नाही. मी घरातच राहणारा मुलगा आहे. गेल्या तीन-चार वर्षांत मी क्वचितच घराबाहेर पडलो असेन; मी फक्त अपरिहार्य कारणास्तव किंवा मित्रांसोबत काहीतरी घडले तरच बाहेर पडलो आहे. अशी वेळ आली होती, जेव्हा मी ५० दिवस घराबाहेर पडलो नव्हतो. मी घराची लिफ्ट देखील पाहिली नव्हती," हार्दिक एका चॅट शोमध्ये सांगत होता. त्याने पुढे सांगितले की,"माझ्याकडे माझी जिम, होम थिएटर आहे. मला आवडणाऱ्या गोष्टी माझ्या घरात आहेत."
हार्दिकला सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सुपर कारमधील त्याच्या एका फोटोबद्दल विचारण्यात आले. पांड्याने त्यावर सांगितले की,''मला कोणीतरी टेस्ट ड्राईव्हसाठी कार पाठवली होती. मी मीडियामध्ये सुरू असलेल्या चर्चांवर टिप्पणी करत नाही, मी ते कधीही केले नाही. याचा मला त्रास होत नाही. "