सिनसिनाटी : स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदाल याने अपेक्षित विजय मिळवतान सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्याचवेळी, अन्य सामन्यात जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेव याला सुरुवातीलाच पराभवाचा सामना पत्करावा लागल्याने त्याची सलग दहा सामन्यांची विजयी मालिका खंडित झाली.
जून महिन्यात विश्वविक्रमी दहाव्यांदा फ्रेंच ओपन जेतेपद पटकावला आणि एकूण १५ ग्रँडस्लॅम विजेतपद पटकावणाºया राफेल नदालने फ्रान्सच्या रिचर्ड गास्केत याचा सरळ दोन सेटमध्ये ६-३, ६-४ असा धुव्वा उडवला. आतापर्यंत १५वेळा गास्केत विरुध्द समोरासमोर आलेल्या नदालने त्याच्याविरुद्ध सर्व लढती जिंकल्या आहेत. नदालच्या आक्रमक खेळापुढे गास्केतचा काहीच निभाव लागला नाही.
दरम्यान, स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने कंबर दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली असून याचा फायदा नदालला मिळेल. या स्पर्धेतून नदालला एटीपी रँकिंमध्ये ब्रिटनच्या अँडी मरेला पिछाडीवर टाकत अव्वल स्थानी येण्याची संधी असेल. पुढील सामन्यात नदालचा सामना स्पेनच्याही अल्बर्ट रामोस विनोलेस याच्याविरुध्द होईल.
रामकुमार रामनाथचे आव्हान संपुष्टात
भारताचा अव्वल एकेरी खेळाडू रामकुमार रामनाथनला या स्पर्धेच्या दुसºया फेरीतंच आपला गाशा गुंडाळावा लागला. अमेरिकेच्या जॅरेड डोनाल्डसन याने त्याला पराभवाचा धक्का दिला. झुंजार खेळाचे प्रदर्शन केल्यानंतर रामकुमारला जॅरेडविरुद्ध ४-६, ६-२, ४-६ असा पराभव पत्करावा लागला.
विशेष म्हणजे जॅरेडविरुद्ध रामकुमारचा हा सलग दुसरा पराभव ठरला. रामकुमारनंतर या स्पर्धेत भारताच्या आशा पुरुष दुहेरीत खेळत असलेल्या रोहन बोपन्नावर अवलंबून आहेत. याआधी लिएंडर पेस आणि अलेक्झांडर ज्वेरेव यांना दुहेरीत पहिल्याच फेरीत पराभवास सामोरे जावे लागले होते.
Web Title: Nadal's winning salute
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.