गुंटूर : महिलांच्या १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत अनोख्या विक्रमांची नोंद होण्याची मालिका सुरुच आहे. काही दिवसांपूर्वीच एका सामन्यात तब्बल १३६ वाइड चेंडू टाकण्याचा अनोखा विक्रम नोंदवला गेल्यानंतर शुक्रवारी नागालँड संघाचा केवळ २ धावांमध्ये खुर्दा उडाला. केरळविरुद्ध झालेल्या या सामन्यात नागालँडच्या तब्बल ९ फलंदाजांना भोपळाही फोडता नाही आला. बीसीसीआयच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्षांखालील एकदिवसीय महिला क्रिकेट स्पर्धेच्या गुंटूर येथील जेकेसी महाविद्यालय मैदानावर झालेल्या लढतीत नागालँडची खराब कामगिरी कायम राहिली. काही दिवसांपुर्वीची झालेल्या नागालँड - मणिपूर सामन्यात तब्बल १३६ वाइड चेंडूंचा मारा झाला होता.
केरळविरुद्धही नागालँडची सुमार कामगिरी कायम राहिली. सलामीवीर मेनका हिनेच केवळ एक धाव काढण्यात यश मिळवले. बाकी सर्व फलंदाज शून्यावर बाद झाले. तसेच, अलीना सुरेंद्रनने एक वाइड चेंडू टाकल्याने नागालँडला दुसरी धाव मिळाली. त्याचवेळी, सौरभ्या पी. (२ बळी), कर्णधार मिन्नू मनी (४), सँड्रा सुरेन (१) आणि बिबी सेबस्टिन (१) यांनी एकही धाव न देता नागालँडला जबर धक्के दिले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय नागालँडच्या चांगलाच अंगलट आला. फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे १७ षटके फलंदाजी करुनही नागालँडला केवळ २ धावांची मजल मारता आली. दखल घेण्याची बाब म्हणजे त्यांचे तब्बल ९ फलंदाज शून्यावर बाद झाले. यानंतर फलंदाजीला उतरलेल्या केरळ संघाला सलामीवीर अंशू राजूने एक चौकार मारुन विजयी केले. त्यातही नागालँडच्या दीपिका कैनतुराने पहिला चेंडू वाइड टाकत केरळचे खाते उघडले आणि त्यानंतर अंशूने चौकार मारत तब्बल २९९ चेंडू राखून केरळला धमाकेदार विजय मिळवून दिला.
>अत्यंत धक्कादायक निकाल लागलेल्या या सामन्याच्या निमित्ताने लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशींवर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाले आहेत.
लोढा शिफारशीनुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) आपल्या मान्यताप्राप्त स्पर्धांमध्ये पूर्वेकडील सर्व राज्यांना समावेश करावा लागणार आहे.
मात्र, आधीच क्रिकेटच्या बाबतीत खूप मागे असलेल्या या राज्यांच्या समावेशामुळे सामने अत्यंत एकतर्फी होत असल्याने खेळाचा दर्जाही खालावत असल्याची चर्चा यानिमित्ताने होत आहे.
Web Title: Nagaland continued to chase down only two runs, while Kerala managed to score only 299 balls
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.