गुंटूर - राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत खेळताना शुक्रवारी नागालँडच्या महिला क्रिकेट संघाने झटपट बाद होण्याचा नवा विक्रम नोंदवला. बीसीसीआयने आयोजित केलेल्या महिलांच्या अंडर-19 क्रिकेट स्पर्धेत केरळ विरुद्धच्या सामन्यात संपूर्ण नागालँडचा संघ फक्त दोन धावांवर ऑलआऊट झाला. नागालँडच्या महिला टीमने गल्लीबोळातल्या संघासारखा खेळ केला. नागालँडच्या संघाने ज्या दोन धावा केल्या त्यातली फक्त एक धाव बॅटमधून निघाली. सलामीवीर मेनकाने 18 चेंडूंचा सामना करुन एक रन्स काढला.
केरळची गोलंदाज अलीना सुरेंद्रनने वाईड बॉल टाकल्यामुळे नागालँडच्या खात्यात एक अवांतर धाव जमा झाली. ज्यामुळे धावफलकावर दोन धावा लागल्या. या संपूर्ण सामन्यात केरळकडून फक्त सुरेंद्रनने धावा दिल्या आणि एकही गडी बाद केला नाही. 3-2-2-0 असे सुरेंद्रनच्या गोलंदाजीचा पृथक्करण होते.
पी. सौरभ्याने सहा मेडन षटके टाकून दोन विकेट घेतल्या. कर्णधार मीनू मानीने चार मेडन ओव्हर टाकून चार विकेट घेतल्या. सांद्रा सुरेन आणि बिब्या सेबस्टीनने प्रत्येकी एक विकेट घेतला. केरळसमोर विजयासाठी फक्त तीन धावांचे लक्ष्य होते. नागालँडच्या दीपिका काईनतुराने पहिला वाईड चेंडू टाकला त्यानंतरच्या चेंडूवर अनसू राजूनने चेंडू सीमापार पाठवत केरळच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.