नागपूर : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार ‘कर्नल’ यांचे नागपूरशी अतूट नाते आहे. याच शहराने त्यांच्या आंतरराष्टÑीय कारकिर्दीला बळ दिले. इराणी करंडकातील शतकामुळे त्यांचा १९७५ मध्ये भारतीय संघात प्रवेश सोपा झाला होता. क्रिकेटमधील या रंजक, तसेच आनंददायी स्मृतींना खुद्द वेंगसरकर यांनीच शनिवारी उजाळा दिला.
एसजेएएनतर्फे आयोजित २० व्या आंतरप्रेस क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी वेंगसरकर यांचे शनिवारी शहरात आगमन झाले. त्यानंतर क्रिकेटचे ते दिवस आठवताना ते म्हणाले, ‘मी तेव्हा १८ वर्षांचा होतो. इराणी करंडकात मुंबईकडून शेष भारताविरुद्ध खेळत होतो. प्रतिस्पर्धी संघात गोलंदाजीतील दिग्गज बिशनसिंग बेदी, इरापल्ली प्रसन्ना आणि मदनलाल यांचा समावेश होता. मी त्या वेळी दणादण खेळी करीत ११० धावा ठोकल्या. तेव्हापासून कधीही मागे वळून बघितले नाही. पुढे राष्टÑीय संघात समावेश झाला. नंतर संघाचे नेतृत्वही केले.’
६१ वर्षांचे वेंगसरकर हे सध्या बेंगळुरू येथील बीसीसीआयच्या राष्टÑीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) चेअरमन आहेत. नागपुरात पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध ते कसोटी सामने खेळले. १९८३ मध्ये पाकविरुद्ध अनिर्णीत राहिलेल्या सामन्यात त्यांनी ६१ आणि १९८६ मध्ये श्रीलंकेविरुद्ध झालेल्या कसोटीत १५३ धावा ठोकल्या होत्या. त्यांच्या शतकी खेळीच्या बळावर भारताने हा सामना एक डाव १०६ धावांनी जिंकताच वेंगसरकर यांना सामनावीर म्हणून गौरविण्यात आले होते. नागपुरात त्यांनी चार वन-डे आंतरराष्टÑीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले.
वेंगसरकर हे भारतीय क्रिकेट बोर्डाच्या राष्टÑीय निवड समितीचे प्रमुख असताना नागपूरपासूनच त्यांच्या कामाची सुरुवात झाली होती.
२००६ मध्ये उत्तर प्रदेश आणि शेष भारत यांच्यात त्या वेळी इराणी करंडकाचा सामना व्हीसीएच्या सिव्हिल लाईन्स स्टेडियमवर खेळविण्यात आला. त्या वेळी कर्नल वेंगसरकर यांना अनेक युवा खेळाडू गवसले. त्यात उत्तर प्रदेशचा वेगवान गोलंदाज प्रवीणकुमार आणि तमिळनाडूचा फलंदाज सुब्रमण्यम बद्रिनाथ यांचा समावेश होता. पुढे कुमार आणि बद्रिनाथ यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले.
नागपूर हे माझे आवडते शहर
‘‘नागपूर हे माझे आवडते शहर आहे. या शहरात मी गेली ४० वर्षे वारंवार येत आहे. माझे अनेक मित्र या शहरात असून क्रिकेटपटू या नात्याने अनेक आठवणी जुळल्या आहेत. या शहराचा चेहरा बदलला असला तरी या शहराने प्रत्येक वेळी माझा मोठा सन्मान केला. नागपूरलादेखील क्रिकेटचा मोठा इतिहास आहे. सिव्हिल लाईन्स येथील जुन्या व्हीसीए स्टेडियमशी माझ्या अनेक आठवणी अद्यापही ताज्या आहेत.’’ - दिलीप वेंगसरकर,
माजी कर्णधार
Web Title: Nagpur strengthened my career; Bedi, Prasanna, Madanlal's mother were against the century - Dilip Vengsarkar
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.