Join us  

AFGvsZIM : अफगाणिस्तानच्या फलंदाजांचा सत्ते पे सत्ता; सलग सात चेंडूंवर खेचले षटकार

येथे सुरू असलेल्या तिरंगी ट्वेंटी-20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी झिम्बाब्वेचा चांगलाच समाचार घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 7:43 PM

Open in App

ढाका : येथे सुरू असलेल्या तिरंगी ट्वेंटी-20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी झिम्बाब्वेचा चांगलाच समाचार घेतला. नजीबुल्लाह झाद्रान आणि मोहम्मद नबी यांनी तर पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना हतबल केले. या जोडीनं सलग सात चेंडूंवर सात षटकार खेचून अफगाणिस्तानच्या धावा वेगाने वाढवल्या. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर अफगाणिस्तानने 5 बाद 197 धावा केल्या.  बांगलादेश, अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिरंगी मालिकेतील पहिला सामना आज खेळवण्यात आला. झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. तेंदाई चतारा ( 2/53) आणि एनस्ली एनडीलव ( 1/35) यांनी अफगाणिस्तानला सुरुवातीला धक्के दिले. सलामीवीर रहमदुल्लाह गुर्बाझने 24 चेंडूंत 43 ( 5 चौकार व 2 षटकार) धावांची खेळी करताना खिंड लढवली. तरीही

अफगाणिस्तानचे अवस्था 4 बाद 90 अशी झाली होती. त्यानंतर आलेल्या नबी आणि झाद्रान या जोडीनं तुफान फटकेबाजी केली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी केली. झाद्रानने 30 चेंडूंत 5 चौकार व 6 षटकार खेचून नाबाद 69 धावा केल्या. नबीनं 18 चेंडूंत 4 षटकारांसह 38 धावा केल्या. या दोघांनी 17व्या आणि 18व्या षटकात मोठा पराक्रम केला. नबीनं 17व्या षटकात चताराच्या गोलंदाजीवर सलग चार षटकार खेचले. त्याच्या पुढच्या षटकात झाद्रानने मॅडझिवाने टाकलेल्या पहिल्याच तीन चेंडूवर षटकार हाणले. या दोघांनी सलग सात चेंडूंत सात षटकार खेचण्याचा पराक्रम केला. 

टॅग्स :अफगाणिस्तानझिम्बाब्वेटी-20 क्रिकेट